भारतात 25 वर्षांनंतर भारत विरुद्ध झिम्बाब्वे वनडे मालिका, जाणून घ्या कुठे आणि कधी होणार सामने

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) भारताच्या वरिष्ठ पुरुष संघ २०२६-२७ या वर्षातील आंतरराष्ट्रीय घरच्या हंगामाचे वेळापत्रक गुरूवारी (२६ मार्च) जाहीर केले आहे. मोठ्या आणि वेगवेेगळ्या स्वरुपाच्या या वेळापत्रकात वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया अशा चार पाहुण्या संघांचा समावेश आहे. या हंगामात १७ शहरांमध्ये एकूण २२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. त्यामधील झिम्बाब्वेचा दौरा विशेष असणार आहे.

यामध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. भारतात २५ वर्षांनंतर भारत विरुद्ध झिम्बाब्वे वनडे मालिका खेळली जाणार असल्याने याचे महत्व अधिक वाढते. झिम्बाब्वेने नुकतेच भारतामध्ये भारताविरुद्ध टी२० विश्वचषक २०२६ चा सामना खेळला आहे. सुपर -८च्या त्या सामन्यात भारताने बाजी मारली होती. त्याआधी दोन्ही संघांमध्ये शेवटचे भारतात २००२ मध्ये वनडे मालिका खेळली गेली होती.

झिम्बाब्वेने आतापर्यंत तीन वेळा भारताचा दौरा केला आहे. त्यामध्ये केवळ वनडे सामने खेळले गेले. १९९२-९३ मध्ये भारताने ३-० अशी ती वनडे मालिका जिंकली होती. २०००-०१ मध्ये पाच सामन्यांची ती मालिका भारताने ४-१ अशी जिंकली होती. त्यानंतर २००१-०२ मध्येही पाच सामन्यांची मालिका खेळली गेली. ती मालिका २-२ अशी बरोबरीत असताना भारताकडून शेवटच्या सामन्यात दिनेश मोगिंया याने तुफानी फलंदाजी केली आणि गुवाहाटीमध्ये खेळला गेलेला तो सामना यजमानांनी १०१ धावांनी जिंकला होता. यावरून झिम्बाब्वेने भारताच्या दौऱ्यातील खेळल्या गेलेल्या तिन्ही वनडे मालिका गमावल्या आहेत.

सध्याचा झिम्बाब्वेचा संघ नव्या ताकदीने भारताला आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वनडे मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ३ जानेवारीला कोलकातामध्ये, दुसरा सामना ६ जानेवारीला हैद्राबादमध्ये आणि तिसरा सामना ९ जानेवारीला मुंबईमध्ये खेळला जाणार आहे.

झिम्बाब्वेचा भारत दौरा
वनडे मालिका

पहिला सामना – ३ जानेवारी, २०२७ (कोलकाता)
दुसरा सामना – ६ जानेवारी, २०२७ (हैद्राबाद)
तिसरा सामना – ९ जानेवारी, २०२७ (मुंबई)

हे तिन्ही सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होणार आहेत.

Comments are closed.