टीम इंडिया विरुद्ध झिम्बाब्वे, T20 पुरुष विश्वचषक 2026: हुकल तर चुकल…!


टीम इंडिया विरुद्ध झिम्बाब्वे, T20 पुरुष विश्वचषक 2026: टी-ट्वेन्टी वर्ल्डकप (T20 Mens World Cup 2026) आता निर्णायक वळणाकडे जात असताना यजमान भारताचं टेन्शन वाढलंय. ही स्थिती निर्माण झाली केवळ एका सामन्यामुळे. साखळीत विजयाचा चौकार ठोकत भारताने आपल्या गटात अव्वल स्थान पटकावून  सुपर एट फेरी गाठलेली. या सुपर एटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमारच्या टीमचा सुपर फ्लॉप शो पाहायला मिळाला. 188 चं टार्गेट गाठताना आपण सपशेल नांगी टाकली. 111 धावांत आपल्याला दक्षिण आफ्रिकेने (South Africa) गुंडाळलं. काही अनाकलनीय डावपेच पाहायला मिळाले. टी-ट्वेन्टी संघात याआधी ज्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये ठसा उमटवलेला त्या अक्षर पटेलला संघाबाहेर ठेवण्यात आलं. यामागे थॉट प्रोसेस काय होती, ते कळतच नाहीये.  ज्याने याआधी स्वत:ला सिद्ध केलंय, त्याला बाहेर ठेवलं आणि जो अधूनमधूनच टी-ट्वेन्टी संघात असतो, त्या वॉशिंग्टन सुंदरला इतक्या महत्त्वाच्या मॅचला प्लेईंग इलेव्हनमध्ये घेतलं.. हा दोघांवरही अन्याय नाहीये का? असे जोखीमभरे निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आपण नाही आहोत.

पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका मॅचचा विचार केल्यास तीन बाद 20 वरून दक्षिण आफ्रिकेने 187 चा पल्ला गाठला. मधल्या ओव्हर्समध्ये आपण त्यांना वेसण घालू शकलो नाही. हार्दिक पंड्याने 4 ओव्हर्समध्ये 45 तर वरुण चक्रवर्तीने 47 धावांची खैरात दिली. अर्थात एका मॅचवरून आपण या दोघांच्याही परफॉर्मन्सला जज करायला नको. तरीही पॉवर प्लेनंतरची मधली षटकं ही फार महत्त्वाची ठरतायत. आता समोर झिम्बाब्वेसारखा तुलनेने कमी अनुभवी पण, मेहनती संघ आहे. त्यांच्यासमोरही ही मधली षटकं सामन्याचा नूर ठरवू शकतात.

भारतीय फलंदाजी ताकदवान आणि सक्षम असली तरी इथून पुढची प्रत्येक मॅच नॉक आऊटसारखी असणार आहे. तेव्हा ‘अभी नही तो कभी नही’ या इराद्यानेच आपल्याला मैदानात उतरावं लागेल. पहिली मॅच 76 च्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्याने आपल्या ग्रुपमधील पॉईंट्स टेबलचा विचार करता एक नजर नेट रनरेटवर ठेवावी लागेल. अभिषेक शर्मा-ईशान किशन जोडीला एकत्र क्लिक व्हावं लागेल. याआधीच्या तीन सामन्यापैकी दोन सामन्यांमध्ये अभिषेक तर गेल्या सामन्यात ईशान शून्यावर माघारी परतलेला. हा इतिहास पुसून टाकत एक उत्तम पायाभरणी झाल्यास मोठ्या स्कोअरकडे नेणारी मधली फळी आपल्याकडे आहे. सांघिक कामगिरीचं दर्शन घडल्यास आपण सेमी फायनल गाठण्याचं स्वप्न अजूनही साकार करू शकतो. गरज आहे ती मागच्या सामन्यातील निराशा मागे सारत भरारी घेण्याची.

Comments are closed.