“मोदी पत्रकार परिषदेपासून पळ काढत होते, पण…”, ट्रम्प यांच्या एका चुकीने फ्रान्समध्ये काय घडले? अमेरिकन राजदूताचा खळबळजनक दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून पदभार स्वीकारल्यापासून स्वतंत्रपणे कोणतीही औपचारिक पत्रकार परिषद घेतलेली नाही. यामुळे विरोधक त्यांच्यावर टीकाही करतात आणि माध्यम प्रतिनिधीही यावर सवाल उपस्थित करतात. हिंदुस्थानातीलच नाही तर नॉर्वे आणि न्यूझीलंडमधील पत्रकारांनीही मोदी माध्यमांशी का बोलत नाहीत याबाबत सवाल उपस्थित केला होता. त्यामुळे मोठा गदारोळ उडाला होता. आता अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनीही मोदींच्या पत्रकार परिषदेसंदर्भात एक खळबळजनक दावा केला आहे.

फ्रान्सच्या एव्हियन लेन बेन्स येथे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जी-7 परिषद पार पडली. या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेण्यास मोदी सरकारचा विरोध होता, असा दावा इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममध्ये बोलताना सर्जियो गोर यांनी केला आहे. मात्र पडद्यामागे ठेवण्यात आलेली ही अट डोनाल्ड ट्रम्प विसरले आणि ट्रम्प यांच्यासोबत मोदींना तब्बल 45 मिनिटे पत्रकारांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला होता.

जी-7 परिषदेतील बैठकीपूर्वी हिंदुस्थानच्या पक्षकारांनी काही मागण्या केल्या आहेत का असे ट्रम्प यांनी विचारले. यावेळी आपण त्यांना सांगितले की, हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एकच स्पष्ट अट ठेवली होती, ती म्हणजे माध्यम प्रतिनिधींना आत प्रवेश दिला जावो, परंतु कोणतीही पत्रकार परिषद किंवा पत्रकारांचे प्रश्न घेऊ नयेत. याबाबत आपण ट्रम्प यांनाही सांगितले होते. ट्रम्प यांनीही यावर सहमती दर्शवली होती, असे सर्जियो गोर यांनी सांगितले.

बैठक सुरू झाली तेव्हा दोन्ही देशांचे प्रमुख समोरासमोर बसले होते. खोलीत जवळपास 50 कॅमेरे आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पत्रकारांची गर्दी झाली होती. मोदी आणि ट्रम्प यांनी आपापली भूमिका मांडली. त्यानंतर ट्रम्प यांनी अचानक पत्रकारांकडे पाहत काही प्रश्न आहेत का? असे विचारले. मोदी सरकार जी गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करत होते, तीच घडली आणि पुढे 45 मिनिटे मोदींना पत्रकारांच्या प्रश्नांचा सामना करावा लागला.

दरम्यान, या अनपेक्षित पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्याच काळामध्ये ओमानच्या समुद्रकिनाऱ्याजवळ अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात तीन हिंदुस्थानी खलाशी ठार झाले होते. दरम्यान, सर्जियो गोर यांच्या दाव्यावर हिंदुस्थान सरकार किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Comments are closed.