भारत ब्रह्मपुत्रावर एक धरण देखील तयार करेल

चीनला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची योजना

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

चीनने ब्रम्हपुत्रा नदीवर मोठी धरणे बांधून भारताची जलकोंडी करण्याची योजना कार्यान्वित केली आहे. आता भारतही चीनच्या या योजनेला तशाच प्रकारच्या मोठ्या योजनेने प्रत्युत्तर देणार आहे. यासाठी भारताने 6 लाख 40 हजार कोटी रुपये खर्चाच्या योजनेला चालना दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून भारत-चीन सीमेच्या आत अरुणाचल प्रदेशात मोठे धरण बांधले जाणार आहे. या धरणामुळे चीनच्या धरणांमधून येणाऱ्या पाण्यापासून आसाम आणि इतर राज्यांचे संरक्षण होणार आहे. तसेच भारतालाही ब्रम्हपुत्रेचे पाणी विद्युत निर्मितीसाठी उपयोगात आणता येणार  आहे. ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित केली जाणार आहे.

ब्रहपुत्रा नदी हिमालयाच्या उत्तरेच्या बाजूने तिबेटमध्ये वाहते. ती अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरुन भारतात प्रवेश करते. या नदीच्या वरच्या भागात चीन मोठी धरणे बांधत आहे. दोन धरण्sा बांधली गेली असून आणखी एका मोठ्या धरणाचे बांधकाम केले जात आहे. यामुळे चीन ब्रम्हपुत्रेच्या भारतात येणाऱ्या पाण्यावर नियंत्रण मिळविण्याच्या खटपटीत आहे. तसे झाल्यास, भारताच्या इंशान्य भागात कधी पाण्याची टंचाई, तर कधी महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो. या संभाव्य संकटाला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही आता सज्ज झाला आहे.

चीनने अधिक पाणी सोडल्यास…

भारतही आता सीमेवरच धरण बांधणार आहे. त्यामुळे चीनने त्याच्या धरणांमधून अधिक पाणी सोडल्यास भारतात पुराचा धोका निर्माण होणार नाही. कारण, चीनचे पाणी भारताने बांधलेल्या धरणात अडणार आहे. तसेच चीनने वरच्या बाजूला अधिक पाणी अडविले तरी ईशान्य भारतात पाण्याची टंचाई होणार नाही. कारण, भारत आपल्या धरणातील पाणी अशा वेळी उपयोगात आणू शकतो. अशा प्रकारे हे प्रस्तावित धरण भारताला मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मिती, चीनच्या विसर्गापासून संरक्षण आणि ईशान्य भारतासाठी जलसाठा, अशा तीन्ही प्रकारे उपयोगी ठरणार आहे. ही योजना पूर्ण करण्यासाठी भारताला 10 वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यासाठी आर्थिक पुरवठा सातत्याने होण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच भारताने 6.4 लाख कोटी रुपयांचा निधी या कामासाठी ठेवण्याची योजना केली आहे.

Comments are closed.