भारत नेहमीच इस्रायलच्या पाठीशी उभा राहील
इस्रायलच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला शब्द : दहशतवादाला ठेचण्यासाठी नेहमीच सहकार्य
वृत्तसंस्था / तेल अवीव
‘भारत आणि इस्रायल यांची युती अभेद्य आहे. भारत नेहमीच इस्रायलच्या समवेत राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही कारणास्तव, कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेतला जाता कामा नये, ही भारताची स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे. ही भूमिका भारत आणि इस्रायल यांच्या घनिष्ट मैत्रीचा पाया आहे. आम्ही शांतीचे समर्थक आहोत. दहशतवादाला गाडून टाकल्याशिवाय शांतीचा अनुभव अशक्य आहे. आम्ही गाझा शांती प्रक्रियेचे समर्थन याच कारणासाठी करत आहोत,’ असे भावोत्कट उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच्या संसदेत भाषण करताना काढले आहेत. बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार साधारणत: 9 वाजून 15 मिनिटांनी त्यांनी भाषणाला प्रारंभ केला.
इस्रालयची संसद ‘नेसेट’ समोर भाषण करणारे ते प्रथमच भारतीय नेते ठरले आहेत. 2017 मध्ये त्यांनी इस्रायलचा प्रथम दौरा केला होता. त्यावेळी इस्रायलला भेट देणारे ते भारताचे प्रथम नेते ठरले होते. बुधवारी ते या देशाच्या संसदेला संबोधिक करणारे प्रथम भारतीय नेते ठरले. आपल्या भाषणात त्यांनी भारत-इस्रायल मैत्री, दोन्ही देशांचे सामरिक आणि आर्थिक संबंध आणि जागतिक परिस्थिती यांचा विस्तृत आढावा घेतला. या मैत्रीचे जागतिक महत्त्व त्यांनी विशद केले. इस्रायलच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा सन्मान केला गेला आहे.
भारत आणि इस्रायलचे ऐतिहासिक संबध
भारत आणि इस्रायल तसेच ज्यू समाज यांचे ऐतिहासिक संबंध आहेत. भारतात ऐतिहासिक काळापासून आजपर्यंत ज्यू समाज निर्भयपणे रहात आहे. आजवर जगात ज्यू लोकांचा जो नरसंहार झाला, त्याचे भारतालाही दु:ख आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराचा आम्ही नेहमी विरोध केला आहे. यापुढेही करत राहू. भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांनी दहशतवादी हिंसाचाराचे चटके सोसले आहेत. ज्याप्रमाणे आम्ही मुंबईवरचा दहशतवादी हल्ला कधी विसरणार नाही, त्याचप्रमाणे आम्ही 7 ऑक्टोबर 2023 ला झालेला इस्रायलवरील दहशतवादी हल्लाही विसरणार नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केले.
दोन्ही देशांची मैत्री विश्वासार्ह
भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. तर इस्रायल हा देश अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आगर आहे. या दोन्ही देशांचे एकमेकांना सहकार्य नवी क्रांती घडवू शकते. इस्रायलने कृषी क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. भारतालाही इस्रायलच्या अनुभवाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे या दोन्ही देशांची युती दोन्ही देशांना मोठा लाभ मिळवून देत असे विचार त्यांनी व्यक्त केले.
हायफाची आठवण
प्रथम महायुद्धात हायफा येथे भारतीय सैनिकांनी मोठा पराक्रम गाजवला होता. हायफा हे इस्रालयशी संबंधित आहे. आधुनिक काळातही तेव्हापासूनच भारत आणि इस्रायलचे असे संबंध आहेत, अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. दोन्ही देश सांस्कृतिक दृष्ट्या कसे एकमेकांच्या समवेत आहेत, हेही त्यांनी भाषणात विशद केले. हिंदू आणि ज्यू धर्मही अनेक दृष्टींनी एकमेकांना समान आहेत. भारताला आयुर्वेद आजही इस्रायलमध्ये लोकप्रिय आहे, ही बाब त्यांनी साधारणत: 35 मिनिटांच्या भाषणात अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केली.
दहशतवादावर दुहेरी मापदंड नकोत
दहशतवादात चांगला दशहतवाद आणि वाईट दहशतवाद असा भेद नाही. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद हा वाईटच असतो. त्यामुळे दहशतवादाशी संघर्ष करताना दुहेरी मापदंड कोणत्याही देशाने आचरणात आणू नयेत. दहशतवादाचे संकट संपूर्ण मानवजातीसाठी असून सर्व जगात एकत्र येऊन त्याचे निराकरण केले पाहिजे. या भारताच्या भूमिकेचा त्यांनी आपल्या भाषणात पुनरुच्चार केला आहे.

पंतप्रधान मोदी यांचे भव्य स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे इस्रायलमध्ये आगमन झाले आहे. या देशातील बेन गुरियान आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे बुधवारी भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांची भेट घेतली. नेत्यानाहू आणि त्यांच्या पत्नी यांनी त्यांचे त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंध आणि अन्य मुद्द्यांवर सविस्तर चर्चा पार पडली. ही चर्चा अत्यंत व्यापक आणि सफल ठरली, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंतर ‘एक्स’वर प्रसारित केला. त्यानंतर त्यांचे इस्रायलच्या संसदेसमोर भाषण झाले.
संबंध अधिक बळकट होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करणारा ठरेल, असे वक्तव्य या दौऱ्याचा प्रारंभ होण्यापूर्वी भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा इस्रायल दौरा आहे. त्यांनी 9 वर्षांपूर्वी 2017 मध्ये प्रथम इस्रायल दौरा केला होता. त्यांचा हा दौरा 2 दिवसांचा असून त्यात संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि आर्थिक संबंधात अनेक करार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारत इस्रायलकडून अत्याधुनिक क्षेपणास्त्रे विकत घेण्याचा आणि नंतर त्या क्षेपणास्त्रांचे भारतात उत्पादन करण्याचा करार करणार आहे, अशी चर्चा आहे. तसेच, इस्रायल भारताला त्याचे ‘आर्यन डोम’ तंत्रज्ञान हस्तांतरित करेल, अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय, अत्याधुनिक ड्रोन्सचा व्यवहारही होणे शक्य आहे. हे ड्रोन्स आकाशात सलग 45 तास संचार करु शकतात. ते अचूकपणे शत्रूच्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्रांचे हल्ले करु शकतात, अशी माहिती तज्ञांकडून देण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत-इस्रायल युतीचे महानायक आहेत. इस्रायलच्या संकटकाळात त्यांनी इस्रायलची पाठराखण केली. ते नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यांनी नेहमीच इस्रायलचा आत्मविश्वास वाढविला आहे. भारत आणि इस्रायल यांची युती अतूट विश्वासाच्या पायावर उभी आहे. दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करीत आहेत, अशी भलावण नेतान्याहू यांनी केली.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी
ड भारत आणि इस्रायल यांची युती आणि भागीदारी नेहमीच अभेद्य राहणार
ड दोन्ही देशांचे एकमेकांशी 2 हजार वर्षांपूर्वीपासूनचे ऐतिहासीक दृढ संबंध
ड इतिहासकाळापासून आजवर भारतात ज्यू समाजाजे निर्भयपणे आहे वास्तव्य
ड भारत आणि इस्रायल यांच्यातले सहकार्य जगात क्रांती घडविण्यास सक्षम
ड इस्रायलने घडविलेल्या कृषी क्रांतीचे भारताला कौतुक, आम्हीही याच मार्गावर
ड भारताचा विकासदर सर्वाधिक, तर इस्रायलही अत्याधुनिक तंत्रज्ञानाची भूमी
ड दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्ही नेहमी इस्रायलची पाठराखण करत राहणार
ड दहशतवादाला गाडण्याच्या संदर्भात कोणाशीही कसलीही तडजोड अशक्य
ड 2008 च्या मुंबई हल्ल्यात अनेक इस्रायलींचाही बळी, आम्ही नाही विसरणार
ड आम्ही शांततेचे समर्थक. गाझा शांती प्रक्रियेला आमचे मनापासून सहकार्य
ड दोन्ही देशांमध्ये उत्कट आणि घनिष्ट तंत्रवैज्ञानिक सहकार्याची दाट शक्यता
ड दोन्ही देशांच्या एकमेकांशी सहकार्याचा लाभ दोन्ही देशांच्या जनतेला होणार
Comments are closed.