हिंदुस्थान रशियाकडून आता तेल खरेदी करणार नाही! ट्रम्प यांनी पुन्हा केली मोदींची पोलखोल
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा एकदा मोदी सरकारची पोलखोल केली. ‘हिंदुस्थान आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असा शब्द नरेंद्र मोदी यांनी मला दिला आहे,’ असा दावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
‘व्हाईट हाऊस’मध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. ‘नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत. आमचे उत्तम संबंध असले तरी हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी करणे आम्हाला पटत नव्हते. कारण त्यातून मिळणारा पैसा रशिया युद्धासाठी वापरत होता. मात्र आता मोदींनी मला शब्द दिला आहे. रशियाकडून तेल खरेदी बंद करणार असे त्यांनी सांगितले आहे. हे मोठे पाऊल आहे. आता चीनलाही तेच करायला भाग पाडायचे आहे, असे ट्रम्प म्हणाले. ‘हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र हे लगेच होणार नाही. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि किचकट आहे,’ असेही ट्रम्प यांनी सांगितले. ऑगस्ट महिन्यात ट्रम्प यांनी हिंदुस्थानी आयातीवर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यातील 25 टक्के टॅरिफ हा रशियाशी व्यापाराबद्दल दंड म्हणून लावण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांतील व्यापार कराराच्या वाटाघाटीही लांबल्या होत्या.
हिंदुस्थानने उत्तर द्यावे! – रशिया
रशिया आणि हिंदुस्थानचे व्यापारी संबंध, विशेषतः ऊर्जा क्षेत्रातील संबंध हिंदुस्थानच्या हिताचे आहेत. हे संबंध आणखी दृढ होत आहेत. ट्रम्प यांनी केलेला दावा खरा की खोटा यावर आम्ही बोलणार नाही. त्याचे उत्तर हिंदुस्थान सरकारने द्यायचे आहे, असे रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी सांगितले.
ही पहिलीच वेळ नाही!
डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानातील मोदी सरकारला तोंडघशी पाडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संघर्षाबद्दलही ट्रम्प यांनी असाच परस्पर दावा केला होता. 200 टक्के टॅरिफची धमकी देऊन हा संघर्ष मीच थांबवला, असे ते म्हणाले होते.
सरकारचा मोघम खुलासा
ट्रम्प यांच्या दाव्यावर मोदी सरकारने स्पष्ट भूमिका मांडली नाही. ‘देशातील नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्याला आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी तेलाचा पुरेसा पुरवठा होणे व किमती स्थिर राहणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगानेच आमचे आयात धोरण ठरते, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले, मात्र हिंदुस्थान रशियाकडून तेल घेणार की नाही हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
ब्रिटनचाही दबाव
आता ब्रिटननेही रशियाची आर्थिक रसद तोडण्यासाठी हिंदुस्थानवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. ब्रिटनने रशियाच्या आघाडीच्या तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करून ते जागतिक बाजारात विकणाऱया हिंदुस्थानी व चिनी कंपन्यांवर निर्बंध लादण्याची तयारीही ब्रिटनने केली आहे.
Comments are closed.