भारताला एस -400 चा चौथा पथक मिळेल
रशियासोबत 5 स्क्वाड्रनसाठी करार : 3 यंत्रणा भारताला प्राप्त
वृत्तसंस्था/मॉस्को
भारताला एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेची चौथी स्क्वाड्रन चालू वर्षाच्या अखेरपर्यंत प्राप्त होणार आहे. डिसेंबरपर्यंत एस-400 स्क्वाड्रन भारतात दाखल होणार आहे. तर पाचवी आणि अंतिम स्क्वाड्रन पुढील वर्षी मिळण्याची अपेक्षा आहे. भारत आणि रशिया यांच्यात 2018 मध्ये एस-400 च्या पाच स्क्वाड्रनसाठी 35 हजार कोटी रुपयांचा करार झाला होता. यातील 3 स्क्वाड्रन चीन अन् पाकिस्तान सीमेवर तैनात करण्यात आल्या असून 2 अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत. एस-400 स्क्वाड्रनमध्ये 16 व्हीकल सामील असतात, ज्यात लाँचर, रडार, कंट्रोल सेंटर आणि सहाय्यक वाहन सामील आहे. ही यंत्रणा 600 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा माग काढू शकते आणि लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता 400 किलोमीटरपर्यंत आहे.
भारतीय वायुदलाने जुलै 2024 मध्ये एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेसह युद्धसराव केला होता. यात एस-400 यंत्रणेने शत्रूच्या 80 टक्के हवाई यानांना नष्ट करण्याची कामगिरी सिद्ध केली होती. यादरम्यान उर्वरित हवाई यानांना मागे हटावे लागले होते. वायुदलाचा हा थिएटर लेव्हलचा युद्धसराव होता, ज्यात एस-400 हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणेची स्क्वाड्रन तैनात करण्यात आली होती. सरावात एस-400 ने स्वत:च्या टारगेटला लॉक करत सुमारे 80 टक्के लक्ष्यांचा अचूक वेध घेतला. सरावाचा उद्देश एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेच्या क्षमतांची पडताळणी करणे होता.
एस-400 यंत्रणा
ही एक हवाई सुरक्षा यंत्रणा असून ती आकाशातून होणारे हल्ले रोखू शकते. शत्रू देशाची क्षेपणास्त्रs, ड्रोन, रॉकेट लाँचर आणि लढाऊ विमानांच्या हल्ल्यांना रोखण्यास ही यंत्रणा उपयुक्त आहे. रशियाच्या एलमाज सेंट्रल डिझाइन ब्युरोने याची निर्मिती केली असून जगातील सर्वात आधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणांमध्ये याची गणना होते.
एस-400 ची वैशिष्ट्ये…
- एस-400 मध्ये 400 या यंत्रणेची मारक पल्ला दर्शवितो, रशियाकडून भारताला प्राप्त यंत्रणा 400 किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकते. तर शत्रू एस-400 चा सहजपणे थांगपत्ता लावू शकत नाही.
- एस-400 ही यंत्रणा रस्तेमार्गाने कुठेही सहजपणे नेता येऊ शकते, हेच याचे सर्वात मोठे वैशिष्ट्या आहे.
- यात 92एन6ई इलेक्ट्रॉनिकली स्टीयर्ड फेज्ड ऐरो रडार लावण्यात आला असून तो सुमारे 600 किलोमीटरच्या अंतरावरूनच अनेक लक्ष्यांना डिटेक्ट करू शकतो.
- ऑर्डर मिळताच 5-10 मिनिटांमध्ये ही यंत्रणा ऑपरेशनसाठी सज्ज होते.
- एस-400 च्या एका युनिटद्वारे 160 ऑब्जेक्ट्सना ट्रॅक केले जाऊ शकते. एका लक्ष्यासाठी 2 क्षेपणास्त्रs डागली जाऊ शकतात.
- ही यंत्रणा 30 किलोमीटरच्या उंचीवरही स्वत:च्या लक्ष्यावर हल्ला करू शकते.
Comments are closed.