रोमांचक सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेच्या तोंडचा घास हिसकावला, सुपर ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूव
भारत विरुद्ध श्रीलंका एशिया कप 2025: आशिया कप सुपर-4 मधील अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात रोमांच एकदम शिगेला पोहोचला होता. आशिया कप 2025 मधील पहिली सुपर ओव्हर याच सामन्यात खेळल्या गेली आणि टीम इंडियाने श्रीलंकेच्या तोंडचा घास हिसकावला, आणि श्रीलंकेचा पराभव केला. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत फक्त 2 धावा केल्या. त्याचे उत्तर देताना भारताने पहिल्याच चेंडूवर लक्ष्य गाठले. अशा प्रकारे भारताने आशिया कप 2025 मध्ये आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली.
8 चौकार, 2 षटकार अन् अभिषेक शर्माची पुन्हा वादळी खेळी
भारतीय संघाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली, कारण उपकर्णधार शुभमन गिल स्वस्तात आऊट झाला. मात्र त्याचा परिणाम अभिषेक शर्मावर काही झाला नाही. त्याने सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर अवघ्या 22 चेंडूत अर्धशतक ठोकले. चालू आशिया कपमध्ये अभिषेकचा हा सलग तिसरा फिफ्टीप्लस स्कोअर ठरला. त्याने एकूण 31 चेंडूत 61 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. कर्णधार सूर्यकुमार यादव पण पुन्हा फेल ठरला आणि तो फक्त 12 धावांवर बाद झाला. अभिषेक आणि सूर्यकुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली.
तिलक वर्मा आणि संजू सॅमसन चमकले
अभिषेक आऊट झाल्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याची जबाबदारी घेतली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 66 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. संजू सॅमसनने 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 23 चेंडूत 39 धावा केल्या. संजू बाद झाल्यानंतर हार्दिक पांड्याचे विकेटही पटकन गेले. मात्र, त्यानंतर तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी 40 धावांची नाबाद भागीदारी करत भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. तिलकने 34 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 49 धावा केल्या, तर अक्षर पटेलने नाबाद 21 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून चरिथ असलंका, दुष्मंथा चमीरा, दासुन शनाका, महीश तीक्षणा आणि वानिंदु हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
निसांकाचं शतक अन् सामना सुपर ओव्हरमध्ये!
धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खुपच खराब झाली. कुसल मेंडिस स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर पथुम निसांका आणि कुसल परेरा यांनी संघाची धुरा हातात घेतली. या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी 127 धावांची भागीदारी केली. कुसल परेराने केवळ 32 चेंडूत 58 धावा केल्या, ज्यात 8 चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. मात्र, वरुण चक्रवर्तीने परेराला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर भारताने चरिथ असलंका आणि कामिंदु मेंडिस यांचीही विकेट घेतली. पण निसांका मात्र ठाम उभा राहिला आणि शानदार शतक ठोकत सामना रंगतदार बनवला.
शेवटच्या षटकात काय घडलं?
निसांकाने फक्त 58 चेंडूत 7 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 107 धावा केल्या. अखेरच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी 12 धावांची गरज होती. त्या षटकातील पहिल्याच चेंडूवर निसांका माघारी परतला. दुसऱ्या चेंडूवर जनिथ लियानागेने 2 धावा घेतल्या, तर तिसऱ्या चेंडूवर बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. चौथ्या चेंडूवर दासुन शनाकाने 2 धावा घेतल्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारला. अखेरच्या चेंडूवर श्रीलंकेला विजयासाठी 2 धावा हव्या होत्या, पण शनाका फक्त 2 धावाच घेऊ शकला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.