मुंबईचा जादुई कनेक्शन! टीम इंडियाचा विश्वचषक विजय आणि ‘2 तारीख’चा भन्नाट योगायोग!

भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी रात्री इतिहास रचत पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास झालेल्या या विजयाने संपूर्ण देश आनंदात न्हाऊन निघाला. घराघरांतून फटाक्यांचा आवाज घुमला आणि टेलिव्हिजनसमोर बसलेल्या लाखो भारतीयांनी जल्लोष साजरा केला.

हा विश्वचषक भारतातच होत असल्याने सुरुवातीपासूनच भारतीय महिला संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. काही सामन्यांतील पराभवांमुळे संघावरील अपेक्षा थोड्या कमी झाल्या होत्या, परंतु अंतिम फेरीत खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ट्रॉफी भारताच्या नावावर केली.

विशेष म्हणजे, मुंबई शहर आणि विश्वचषक यांच्यातील संबंध पुन्हा अधोरेखित झाला आहे. 2011 मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघाने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता. यावेळी महिलांनीही त्याच शहरातील डीवाय पाटील स्टेडियमवर विजेतेपद मिळवले. त्यामुळे भारताने दोन वेळा मुंबईच्या भूमीत एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा अनोखा विक्रम केला आहे.

2011 नंतर प्रथमच भारताने एकदिवसीय विश्वचषकात विजेतेपद मिळवले असून, या विजयाने भारतीय महिला क्रिकेटचा नवा अध्याय सुरू झाला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या संघाने देशभरातील लाखो महिला खेळाडूंना प्रेरणा दिली आहे.

अंतिम सामन्यात शेफाली वर्माने चमकदार कामगिरी केली. तिने फलंदाजीत 87 धावा केल्या तर गोलंदाजीतही तिने निर्णायक भूमिका बजावली. चेंडूने तिने 2 विकेट्स घेतल्या.

Comments are closed.