शफाली वर्माची वादळी फलंदाजी, भारताचा श्रीलंकेवर 8 विकेटनं विजय, आणखी एक मालिका जिंकली
IND W vs SL W तिरुवनंतपुरम : भारतीय महिला क्रिकेट संघानं वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तोच फॉर्म टी 20 मध्ये देखील कायम ठेवलं आहे. भारतानं श्रीलंकेला तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये 8 विकेटनं पराभूत केलं आहे. तिसरी टी 20 मॅच तिरुअनंतपुरम येथे खेळवली गेली. या मॅचमध्ये भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला 112 धावांवर रोखलं. भारतानं हे आव्हान 14 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं 3-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. शफाली वर्मा हिनं 42 बॉलमध्ये 79 धावांची वादळी खेळी करत भारताला मोठा विजय मिळवून दिला.
भारतानं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं श्रीलंकेच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. 45 धावांवर श्रीलंकेनं 4 विकेट गमावल्या होत्या. इमेशा दुलानी 27 धावा, कविशा दिलहारी 20 धावा या दोघींच्या 40 धावांच्या भागीदारीनं श्रीलंकेनं 100 धावांचा टप्पा पार केला. 20 ओव्हरमध्ये श्रीलंकेनं 112 धावा केल्या.
भारताची सुरुवात खराब झाली. स्मृति मानधना 1 रन करुन बाद झाली. जेमिमा रॉड्रिग्ज देखील 9 धावा करुन बाद झाली. दुसीरकेड शफाली वर्मानं फटकेबाजी सुरु ठेवली. शफाली वर्मानं 24 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. भारतीय महिला क्रिकेट इतिहासातील टी 20 मधील तिसरं वेगवान अर्धशतक ठरलं.
शफाली वर्मानं 42 बॉलमध्ये 79 धावा केल्या. तिनं 11 चौकार आणि 3 षटकार मारले. शफाली वर्मानं कॅप्टन हरमनप्रीत कौर सोबत 48 धावांची भागीदारी करत विजय निश्चित केला. हरमनप्रीत कौर हिनं 18 धावा केल्या.
मालिकेत भारत 3-0 नं आघाडीवर
पाच टी 20 सामन्यांची मालिका 30 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. भारतानं पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवला आहे. भारतानं पहिली टी 20 मॅच 8 विकेटनं जिंकली, दुसरी टी 20 मॅच 7 विकेटनं जिंकली तर तिसरी मॅच 8 विकेटनं जिंकली आहे.
दरम्यान, भारताच्या महिला संघानं वनडे वर्ल्ड कपमधील फॉर्म टी 20 क्रिकेट मध्ये देखील कायम ठेवला आहे. वनडे वर्ल्ड कपनंतरची पहिली टी 20 मालिका भारतानं जिंकली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.