IND W vs AUS W …म्हणून हिंदुस्थानचा महिला संघ निर्णायक लढतीत निळ्या नाही तर गुलाबी जर्सीत उतरला मैदानात!

हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली होती. त्यानंतर हिंदुस्थानने दुसरा सामना 100 हून अधिक धावांनी जिंकत मालिका बरोबरीत साधली. त्यामुळे मालिका विजयासाठी ही लढत निर्णायक ठरणार आहे.

निर्णायक लढतीमध्ये हिंदुस्थानचा महिला संघ निळ्या नाही तर गुलाबी रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला आहे. त्यामुळे महिला संघाच्या जर्सीचा रंग बदलला की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र यामागे मोठे कारण असल्याचे समोर आले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आणि एसबीआय लाईफ यांनी स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी खास मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे हिंदुस्थानचा महिला संघ गुलाबी रंगाची जर्सी घालून मैदानात उतरला. नाणेफेकीवेळीही कर्णधार हरमनप्रीत कौर गुलाबी रंगाच्या जर्सीत मैदानात आली होती.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओमध्ये हरमनप्रीत कौर म्हणाली की, ‘आम्ही रोज अनिश्चित परिस्थितीसाठी स्वत:ला तयार करत असतो. आपण सदैव सज्ज रहायला हवे याची आठवण ही गुलाबी जर्सी आम्हाला करून देते. चला, स्तन तपासणीला आपल्या मासिक दिनचर्येचा भाग बनवूया आणि कर्करोगाविरुद्ध उभे राहूया.’

Comments are closed.