'या' गोष्टीमुळं भारताचा WTC फायनलमध्ये दुहेरी पराभव, अश्विनचा खळबळजनक खुलासा!
भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये प्रवेश केला असला, तरी दोन्ही वेळा संघाला अपयशच पदरी पडलं. 2021 मध्ये न्यूझीलंडकडून 8 गडी राखून, तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून तब्बल 209 धावांनी पराभव स्वीकारावं लागला. या दोन्ही पराभवामागे एक महत्त्वाचं कारण असल्याचं मत भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने व्यक्त केलं आहे.
अश्विनच्या म्हणण्यानुसार, या दोन्ही फायनल्स आयपीएल संपल्यानंतर काहीच दिवसांत खेळल्या गेल्या. त्यामुळे संघाला कसोटी क्रिकेटसाठी आवश्यक असलेली तयारी आणि मानसिकता मिळाली नाही. आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विनने सांगितले की, “आयपीएलनंतर थेट टेस्ट फायनल खेळणे कठीण असते. कसोटी क्रिकेटला योग्य आदर आणि वेळ दिला गेला पाहिजे. अन्यथा आपण मोठ्या सामन्यांमध्ये अपयशी ठरतो.”
फक्त भारतच नव्हे, तर वेस्ट इंडिज संघाच्या कमकुवत कामगिरीचं कारणही अश्विनने फ्रँचायझी टी20 क्रिकेट असल्याचं सांगितलं आहे. भारताविरुद्ध झालेल्या कसोटीत वेस्ट इंडिज संघ पूर्णपणे सपशेल अपयशी ठरला. पहिली कसोटी तिसऱ्याच दिवशी संपली. दुसऱ्या कसोटीतही त्यांची परिस्थिती सुधारलेली दिसत नाही. यावर भाष्य करताना अश्विन म्हणाला, “वेस्ट इंडिजच्या अनेक खेळाडूंनी 22 सप्टेंबरपर्यंत सीपीएलमध्ये सहभाग घेतला. लीग संपताच थेट कसोटीत उतरणं म्हणजे कोणतीही तयारी नसल्यासारखं आहे.”
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली आहे. दिल्लीतील सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वालने शानदार खेळी करत पहिल्या दिवसअखेर 173 धावांवर नाबाद मजल मारली, तर साई सुदर्शनने 87 धावा केल्या. सध्या जयस्वालसोबत शुबमन गिल फलंदाजी करत असून भारताचा डाव भक्कम वाटतो आहे.
Comments are closed.