देश विदेश – नेपाळमधील 100वरील हिंदुस्थानी नोटा चलनात

मोठय़ा मूल्यांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर जवळपास एका दशकानंतर नेपाळ आता 100पेक्षा जास्त मूल्याच्या हिंदुस्थानच्या चलनी नोटांच्या वापराला परवानगी देण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे कामगार, विद्यार्थी, यात्रेकरू आणि पर्यटकांचा प्रवास सुलभ होणार असून व्यापारालाही गती मिळण्याची अपेक्षा आहे. मोठय़ा मूल्यांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर जवळपास एका दशकानंतर, नेपाळ आता 100पेक्षा जास्त मूल्याच्या भारतीय चलनी नोटांच्या वापराला परवानगी देण्याच्या तयारीत आहे. ‘‘आम्ही अंतिम टप्प्यात आहोत. आम्ही नेपाळ गॅझेटमध्ये सूचना प्रकाशित करण्याच्या तयारीत आहोत आणि त्यानंतर नवीन नियमाबद्दल बँका आणि वित्तीय संस्थांना परिपत्रके जारी करू,’’ असे नेपाळ राष्ट्र बँकेचे प्रवत्ते गुरू प्रसाद पौडेल यांनी सांगितले.
दिल्लीत ग्रॅप 4 लागू, सर्व बांधकामे थांबवणार
दिल्ली आणि एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अत्यंत गंभीर पातळीवर पोहोचली आहे. या बिघडलेल्या स्थितीमुळे, सरकारने ग्रेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनचा चौथा टप्पा (ग्रॅप 4) तातडीने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रॅपच्या चौथ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने दिल्लीतील सर्व प्रकारची बांधकामे थांबवण्यात येणार आहेत. तसेच दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली आणि राज्य सरकार विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्ग घेण्याचा निर्णय घेऊ शकते. आवश्यक वस्तू वाहून नेणारे आणि आवश्यक सेवांमध्ये सहभागी असलेले सीएनजी आणि इलेक्ट्रिक ट्रक वगळता, इतर सर्व ट्रकच्या दिल्लीतील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
चांदी थेट अडीच लाखांवर जाण्याची शक्यता
गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठय़ा प्रमाणात चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कधी या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत वाढते, तर कधी क्षणात या दोन्हीची किंमत लगेच कमी होताना पाहायला मिळते. या वर्षी तर सोन्यापेक्षा चांदीच्या भावात तुफान वाढ झालेली पाहायला मिळाली. एका वर्षात चांदीचा भाव साधारण 120 टक्क्यांनी वाढला आहे. दरम्यान, आता याच चांदीचा भाव पुढच्या वर्षात थेट अडीच लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या वर्षात चांदीचा भाव साधारण 120 टक्क्यांनी वाढला. शुक्रवारी देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव 2 लाख रुपये प्रति किलोच्याही वर पोहोचला आहे. चांदीच्या भावाने गेल्या 46 वर्षांचा रेकॉर्ड मोडलेला आहे. 1979 सालानंतर पहिल्यांदाच चांदीचा दर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वाढलेला आहे.

Comments are closed.