Indian astrophysicist Dr Jayant Naralikar passed away in Pune


पुणे : जेष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आंतररष्ट्रीय स्तरावर ज्यांचा खगोल शास्त्रातील अधिकार मान्य झाला होता, असे जयंत नारळीकर तेवढ्याच रसाळ भाषेत मराठी विज्ञानकथा लिहण्यासाठी देखील लोकप्रिय होते. केंब्रीज विद्यापीठातून शिक्षण घेतल्यावर ते भारतात परतले. आधी टाटा मुलभूत संशोधन संस्थेत त्यांनी काम केले. त्यानंतर आयुका संस्थेच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. 2021मध्ये नाशिकमध्ये झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते‌. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. (Indian astrophysicist Dr Jayant Naralikar passed away in Pune)

हेही वाचा : Chhagan Bhujbal : मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी छगन भुजबळ म्हणाले, आठ दिवस आधीच… 

जयंत नारळीकर यांच्या निधनाने विज्ञान विश्वात मोठी पोकळी

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानलेखक आणि विज्ञान प्रसारक प्रा. जयंत विष्णु नारळीकर यांच्या निधनाने विज्ञान विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. प्रा. नारळीकर हे जागतिक पातळीवर खगोलशास्त्रात आपल्या संशोधनामुळे ओळखले गेले. त्यांचे कार्य भारतासाठी महत्वाचे होते. मराठी मातीच्या या सुपुत्राने खगोलशास्त्रात मारलेली झेप निश्चितच महाराष्ट्रासाठी अभिमानाची होती. राज्य शासनाला देखील त्यांनी वेळोवेळी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन केलं होतं. पुण्यात ‘आंतरविश्व विद्यापीठ’ स्थापना करून राज्यात विज्ञान संशोधनाची भक्कम पायाभरणी त्यांनी केली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्राला वैज्ञानिक क्षेत्रात आघाडीचे स्थान प्राप्त झाले. त्यांचे निधन हे राज्यासाठी आणि देशासाठी मोठी हानी आहे. नव्या पिढीतील वैज्ञानिक आणि खगोलशास्त्रज्ञ हे निश्चितच डॉ नारळीकर यांची प्रेरणा घेत राहतील असा मला विश्वास आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात.

अशी आहे कारकीर्द

आंतरराष्ट्रीय किर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणितज्ञ होते. डॉ. नारळीकरांचं संस्कृतवरही प्रभुत्व आहे. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या. डॉ. नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले. तेथूनच त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठातून त्यांनी बी.ए. एम.ए. आणि पी.एचडी.च्या पदव्या मिळवल्या. त्या काळात त्यांनी रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळवली. त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी. केली. सर फ्रेड हॉईल डॉ. नारळीकरांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले. त्यामुळे 1966 साली जेव्हा हॉईल यांनी केंब्रीज येथे ‘इन्स्टिट्यूट ऑफ थिऑरॉटीकल अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ नावाची जी स्वत:ची संस्था सुरू केली, त्यात डॉ. नारळीकरांचाही महत्त्वाचा वाटा होता. 1966 ते 1972 पर्यंत ते या संस्थेशी निगडित होते. सर हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोलशास्त्रात एकत्र संशोधन केलं. गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो ‘हॉईल-नारळीकर सिद्धांत’ या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे. अल्बर्ट आईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांताशी साधर्म्य साधणारा असा हा सिद्धांत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर भारतातील खगोल शास्त्रातील संशोधनाला आणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी 1972 साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले. कालांतराने 1988 साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त झाली. डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम तर आहेतच, पण त्याचबरोबर मराठी साहित्यात त्यांनी फार मोलाची भर घातली. त्यांच्या ‘यक्षांची देणगी’ या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. मराठीच नव्हे, तर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम काटेकोरपणे रचण्याचे कामही त्यांनी केले. 1965 साली त्यांना पद्मभूषण तर 2004 साली पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम.पी. बिरला सन्मान आणि फ्रेंच अ‍ॅस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले. लंडनच्या रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी आहेत.



Source link

Comments are closed.