पाकिस्तानच्या पार्ट-टाइम बॉलरच्या जाळ्यात भारतीय फलंदाज; हार्दिक शून्यावर माघारी

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबोच्या मैदानावर रोमांचक सामना खेळला जात आहे. अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर इशान किशनने बॅटने जोरदार धुमाकूळ घातला. इशानने झंझावाती फलंदाजी करत ७७ धावांची धमाकेदार खेळी केली, ज्याच्या जोरावर भारतीय संघ एका टप्प्यावर अतिशय मजबूत स्थितीत दिसत होता.
मात्र, पाकिस्तानच्या एका पार्ट-टाइम गोलंदाजाने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये संपूर्ण खेळाचे चित्रच पालटून टाकले. हा पार्ट-टाइम गोलंदाज दुसरा कोणी नसून सॅम अयुब होता. अयुबने आपल्या स्पेलमध्ये इशान आणि तिलक वर्मा यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तर हार्दिक पंड्याला खातेही उघडू दिले नाही.
कोलंबोच्या मैदानावर सॅम अयुब पाकिस्तानसाठी ट्रम्प कार्ड ठरला. संथ खेळपट्टीचा अयुबने पुरेपूर फायदा उठवला आणि भारतीय फलंदाज त्याच्यासमोर अडचणीत दिसले. अयुबने आपला पहिला बळी इशान किशनला बनवले. इशान ४० चेंडूत ७७ धावा कुटून आपल्या शतकाकडे वेगाने कूच करत होता.
मात्र, अयुबच्या हातातील चेंडूचा अंदाज घेण्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला आणि क्लीन बोल्ड झाला. यानंतर अयुबने तिलक वर्माची खेळी संपवली. तिलक बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर हार्दिक पंड्यादेखील मोठा शॉट खेळण्याच्या नादात सॅम अयुबला आपली विकेट भेट देऊन बसला. हार्दिक ‘गोल्डन डक’वर बाद झाला.
आर. प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि सलमान आगाने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पाकिस्तानची सुरुवातही योजनेनुसार झाली आणि सलमान आगाने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माला बाद केले. मात्र, त्यानंतर दुसऱ्या टोकाला असलेल्या इशान किशनने आपले तेवर दाखवण्यास सुरुवात केली. शाहीन शाह आफ्रिदीच्या दुसऱ्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार ठोकून इशानने आपले इरादे स्पष्ट केले.
या डावखुऱ्या फलंदाजासमोर पाकिस्तानची गोलंदाजी पूर्णपणे हतबल दिसली आणि त्याने अवघ्या २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. इशानने केवळ ४० चेंडूंचा सामना करत ७७ धावांची धमाकेदार खेळी केली. आपल्या या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार लगावले.
Comments are closed.