चीनमध्ये अडकलेला भारतीय नागरिक

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताचे नागरिक अनंत मित्तल यांना चीनने 15 तासांहून अधिक काळ अडकवून ठेवले, अशी घटना समोर आली आहे. मित्तल हे यूट्यूब व्ह्लोगर असून त्यांनी अरुणाचल प्रदेशसंबंधी एक टिप्पणी इंटरनेटवर केल्याने चीनने त्यांची छळवणूक केल्याची माहिती देण्यात आली. मित्तल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम संदेशात त्यांच्यावर ओढविलेल्या प्रसंगाचे वर्णन केले असून, संताप व्यक्त केला आहे.

ही घटना गेल्या आठवड्यात, म्हणजे 15 डिसेंबरला घडली आहे. ते चीनला पर्यटक म्हणून गेले होते. तेथे चिनी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अनेक तास अडकवून ठेवून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांची अवमानना करण्यात आली. ते एका मित्राला भेटण्यासाठी चीनला गेले होते. त्याआधी त्यांनी अरुणाचल प्रदेशच्या संदर्भात एक टिप्पणी इंटरनेटवर टाकली होती. चिनी अधिकाऱ्यांना ती आक्षेपार्ह वाटल्याने त्यांनी मित्तल यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती.

अरुणाचलवर चीनचा दावा

भारताचा अरुणाचल प्रदेश आपला असल्याचा चीनचा दावा आहे. त्यामुळे या प्रदेशात भारताच्या कोणत्याही हालचालींना त्या देशाचा विरोध असतो. अरुणाचल प्रदेश हे राज्य भारताच्या स्वातंत्र्यापासून भारताचा भाग आहे. तथापि, तो दक्षिण तिबेटचा भाग असल्याने त्याच्यावर आपला अधिकार आहे, अशी चीनची समजूत आहे. भारताने या प्रदेशावर आपला अधिकार ठामपणे प्रस्थापित केला असून चीनचा दावा पूर्णत: नाकारला आहे. तथापि. चीन या भागाचे निमित्त करुन नेहमी भारतातची कुरापत काढत असतो. काही दिवसांपूर्वी एका भारतीय वंशाच्या, पण सध्या ब्रिटनचे नागरिकत्व असलेल्या एका महिलेलाही तिच्याकडे अरुणाचल प्रदेशचा पासपोर्ट असल्याच्या कारणावरुन चीनमध्ये आडविण्यात आले होते. अनेक तासांच्या नंतर तिची सुटका करण्यात आली होती. आता मित्तल यांच्यासंबंधातही असाच प्रकार घडला असून त्यांची 15 तासांच्या नंतर सुटका करण्यात आली.

अनपेक्षित अटकाव

मित्तल चीनमध्ये पोहचल्यानंतर त्यांची कागदपत्रे तपासण्यात आली. नंतर अचानकपण्sा त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची पाठवणी डिटेन्शन सेंटरमध्ये करण्यात आली. त्यांना का पडकण्यात आले आहे, याचे कारणही स्पष्ट करण्यात आले नाही. दोन चीनी अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. प्रथम हे  अधिकारी त्यांना सौम्य वाटले. तथापि, नंतर त्यांनी अधिक कठोरपणे चौकशी करण्यास प्रारंभ केला. त्यांनी मित्तल यांचे सामान तपासले आणि काही इलेक्ट्रॉनिक साधने ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यांनी त्यांच्या युट्यूब वाहिनीवर अरुणाचल प्रदेशच्या संदर्भात एक टिप्पणी पोस्ट केली होती. ती भारताच्या बाजूने होती. त्यामुळे चिनी अधिकारी संतापले होते. त्यांनी या टिप्पणीसंबंधी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर मित्तल यांच्या लक्षात सारा प्रकार आला. त्यांना जवळपास 15 तास अकडवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी असा प्रकार पुन्हा होणार नाही, अशी हमी दिल्यानंतर त्यांची सुटका झाली.

घाबरलेल्या स्थितीत

चीनमध्ये जो अनुभव मित्तल यांना आला, त्यामुळे ते आजही भयभीत स्थितीत आहेत. भारत आणि चीन यांच्यात अरुणाचल प्रदेशवरुन वाद आहे. आपण या वादात पडायला नको होते. भारताच्या बाजूने टिप्पणी करावयास नको होती, अशी त्यांची भावना झाली आहे. डिटेन्शन सेंटरमध्ये त्यांना अन्नही देण्यात आले नाही. तसेच कोणाशी फोनवरून बोलूही देण्यात आले नाही. परिणामी, त्यांना खूपच मनस्ताप झाला. आपलीच चूक झाली, अशी त्यांची आता भावना झाली आहे. ती त्यांनी त्यांच्या मित्रांकडे आणि पत्रकारांसमोरही व्यक्त केली आहे. यापुढे आपण कोणत्याही वादग्रस्त विषयावर आपली भूमिका जाहीर करणार नाही, असे भारतात परतल्यानंतरही मित्तल म्हणत आहेत. त्यांचे हे म्हणणे अनेकांना पटलेले नाही.

Comments are closed.