भारतीय क्रिकेटमध्ये निवृत्तीची सुनामी… 9 महिन्यांत 4 दिग्गज खेळाडूंनी घेतला संन्यास, पाहा यादी

भारतीय क्रिकेटमधील भक्कम भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यासाची घोषणा केली आहे. सलग दोन वर्षे निवड समितीकडून दुर्लक्षित झाल्यानंतर शेवटी पुजाराने हात टेकले. रविवारी (२४ ऑगस्ट) त्याने क्रिकेटला अलविदा केला. गेल्या दशकभर भारतीय संघाचा कणा असलेला पुजारा मागील काही वर्षांत मात्र अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे 2023च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर त्याला संघातून बाहेर करण्यात आले. त्यानंतर त्याने खूप मेहनत घेतली पण पुनरागमन करू शकला नाही. त्याच्या जागी तरुणांना संधी मिळाली, पण आजवर कोणीही पुजारासारखा नंबर-3 वर ठसा उमटवू शकला नाही.

पुजाराने भारतासाठी एकूण 103 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 71195 धावा केल्या. त्याने 19 शतके आणि 35 अर्धशतके झळकावली. 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने करिअरची सुरुवात केली आणि 2023 मध्ये कंगारूंच्याच संघाविरुद्ध त्याने अखेरचा सामना खेळला. त्यानंतर पुजाराला संघात संधी मिळाली नाही आणि अखेर त्याने निवृत्ती घेतली.

भारतीय क्रिकेटमधील ‘रिटायरमेंट सुनामी’

गेल्या काही महिन्यांत भारतीय क्रिकेटमध्ये दिग्गज खेळाडूंनी एकामागून एक संन्यास घेतला. मागील 9 महिन्यांत तब्बल 6 दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केलं आहे. त्यापैकी चार खेळाडू टीम इंडियाचा मजबूत आधारस्तंभ होते.

मागील 9 महिन्यांत संन्यास घेणारे भारतीय खेळाडू

18 डिसेंबर 2024: ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन टेस्टनंतर दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन यांनी सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेतला. त्याने 106 कसोटीमध्ये 537 विकेट्स घेतल्या.

1 फेब्रुवारी 2025: भारताचा माजी यष्टिरक्षक ऋद्धिमान साहाने निवृत्ती जाहीर केली. त्याने 40 कसोटीमध्ये 1353 धावा आणि 92 झेल टिपले.

7 मे 2025: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला अलविदा केला. याआधी 29 जून 2024 रोजी त्याने टी20 मधून निवृत्ती घेतली होती. रोहितने 67 कसोटीमध्ये 4301 धावा केल्या आहेत.

12 मे 2025 : रोहितनंतर लवकरच विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कोहलीने 123 कसोटीमध्ये 9230 धावा फटकावल्या आहेत.

6 जून 2025: माजी लेग स्पिनर पियूष चावला याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. तो 2011 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता.

24 ऑगस्ट 2025: आता चेतेश्वर पुजारानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यासाची घोषणा केली आहे.

Comments are closed.