आशिया कपच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, टीम इंडियाने रचला विश्वविक्रम!!

भारतीय क्रिकेट संघाने यूएई संघाला 9 गडी राखून दणदणीत पराभूत केले. या सामन्यात भारतासाठी गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही जबरदस्त खेळ केला. भारताच्या विजयात कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांनी मोलाची भूमिका बजावली. या विजयामुळे भारताला दोन गुण मिळाले असून तो आपल्या गटात अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

भारताकडून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलच्या जोडीने सलामी दिली. सुरुवातीपासूनच या दोघांनी आक्रमक फलंदाजी केली आणि यूएईच्या गोलंदाजांना कसलीही संधी दिली नाही. मैदानाच्या चारही बाजूंना फटकेबाजी करत या जोडीने संघाचा पाया मजबूत केला. अभिषेकने केवळ 16 चेंडूत 30 धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. गिलने 9 चेंडूत 20 धावा ठोकल्या, ज्यात दोन चौकार आणि एक षटकार होता. सूर्यकुमार यादवने 2 चेंडूत 7 धावा जोडल्या. या आक्रमक फलंदाजीमुळे भारताने अवघ्या 4.3 षटकांत लक्ष्य गाठले आणि नवा इतिहास रचला.

आशिया कपच्या (वनडे आणि टी20 फॉर्मॅट) इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने 5 षटकांपूर्वी लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवला. यापूर्वी हे कुणालाही जमले नव्हते. भारत आशिया कपमधील सर्वात कमी षटकांत विजय मिळवणारा संघ ठरला आहे. अभिषेक आणि गिलच्या धडाकेबाज खेळीमुळेच हे शक्य झाले.

भारताने यूएईविरुद्ध टी20 आय सामन्यात तब्बल 93 चेंडू राखून विजय मिळवला. हे टी20 क्रिकेटमधील भारताचे ‘सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेले विजेतेपद’ ठरले आहे. याआधी 2021 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध भारताने 81 चेंडू राखून विजय मिळवला होता.

भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे यूएईचा डाव केवळ 57 धावांत गडगडला. कुलदीप यादवने भेदक गोलंदाजी करत 4 बळी घेतले. शिवम दुबेनंही 3 बळी घेत आपली भूमिका बजावली.

Comments are closed.