… आणि पर्थचे तापमान वाढले

विराट कोहली आणि रोहित शर्माचा हिंदुस्थानचा क्रिकेट कारवाँ गुरुवारी सकाळी ऑस्ट्रेलियन भूमीवर उतरताच विमानतळावरच चाहत्यांच्या जल्लोषाने पर्थचे तापमान काही अंशांनी वाढल्यासारखे वाटले. विराट कोहली, रोहित शर्मा आणि नव्या दमाचा कर्णधार शुभमन गिल हे त्रिकूट एकत्र येताच जणू रणांगणावर देव, योद्धा आणि तरुण सेनापती सज्ज झाल्याचा भास झाला.

कोहली, रोहित आणि गिलसोबत के. एल. राहुल, यशस्वी जैसवाल, अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डीही संघात सामील झाले. सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यही या प्रवासात सहभागी झाले होते, तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बाकी प्रशिक्षक दल दिल्लीहून संध्याकाळच्या विमानाने रवाना झाले असून दिवसाच्या उत्तरार्धात संघात सामील होणार आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची वन डे मालिका 19 ऑक्टोबरला पर्थ येथे सुरू होईल. दुसरा सामना 23 ऑक्टोबरला अॅडलेडमध्ये, तर तिसरा आणि अंतिम सामना 25 ऑक्टोबरला सिडनीमध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका होईल, जी 29 ऑक्टोबरपासून सुरू होईल. म्हणजेच हा महिना क्रिकेटप्रेमींसाठी एक अखंड उत्सव ठरणार आहे.

ही मालिका विशेष आहे कारण ही विराट कोहली आणि रोहित शर्माची चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतरची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका आहे. दोघांनी कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे त्यांच्या वन डे भविष्यासंदर्भात चर्चा रंगू लागल्या होत्या, विशेषतः शुभमन गिलला नवीन वन डे कर्णधार बनवल्यानंतर. परंतु दोन्ही अनुभवी खेळाडू अजूनही 2027 च्या वन डे विश्वचषकापर्यंत खेळण्याच्या मनःस्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरे सांगायचे तर क्रिकेटचा आत्माच काहीतरी वेगळं वाटतो जेव्हा रोहितचा पुल शॉट आणि विराटचा कव्हर ड्राईव्ह एकाच सामन्यात दिसतो.

नवा कर्णधार शुभमन गिलनेही आपल्या वक्तव्यात या दोघांना ठाम पाठिंबा दिला. त्याने वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर म्हटलं होतं, विराट आणि रोहितचा अनुभव अनमोल आहे. त्यांनी हिंदुस्थानसाठी जितक्या वेळा विजय मिळवून दिले तितक्या वेळा त्यांनी संघाला शिकवलं की सातत्य म्हणजे काय. एवढा अनुभव, कौशल्य आणि शिस्त असलेले खेळाडू जगात मोजकेच आहेत. गिलच्या या विधानाने स्पष्ट होतं की, तो तरुण असूनही सीनियर खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी क्रिकेटला पुढच्या पातळीवर नेण्यास तयार आहे.

या संघात तरुणाई आणि अनुभवाचं अप्रतिम मिश्रण दिसत आहे. विराट आणि रोहितसारखे अनुभवी फलंदाज स्थैर्य देतात, तर यशस्वी जैसवाल, नितीश रेड्डी आणि हर्षित राणासारखे तरुण खेळाडू ऊर्जेचा नवा झरा आणतात. अर्शदीप सिंहला जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीचं नेतृत्व करण्याची मोठी संधी मिळणार आहे.

Comments are closed.