गुड न्यूज,भारताची अर्थव्यवस्था 2025-26 मध्ये 6.5 टक्क्यांच्या दरानं वाढणार, एस अँड पीचा अंदाज
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भातील दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जनं 2025-26 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.5 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर, आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 6.7 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. जीएसटीच्या स्लॅबमधील कपात आणि आरबीआयनं पतधोरण जाहीर करताना केलेल्या कपातीमुळं मागणी वाढेल, असा अंदाज एस अँड पी नं वर्तवला आहे.
भारताचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा जीडीपी चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या कालावधीत 7.8 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
S & P Report : रिपोर्टमध्ये काय म्हटलं?
दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी वाढीच्या अंदाजाची अधिकृत आकडेवारी 28 नोव्हेंबरला जारी होणार आहे. एस अँड पीनं त्यांच्या इकोनॉमिक आऊटलूक एशिया पॅसिफिक रिपोर्टमध्ये म्हटलं की आमच्या अंदाजानुसार भारताचा जीडीपी 2025-06 ला 6.5 टक्क्यांनी वाढेल. तर, 2026-27 मध्ये जीडीपी वाढीचा दर 6.7 टक्के असेल. अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लादून देखील देशांतर्गत मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर 6.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर 6.5 टक्के होता. एस अँड पीनं म्हटलं की वस्तू आणि सेवा कराचे दर कमी केल्यानं मध्यम वर्गाची मागणी वाढवेल. या वर्षाच्या सुरुवातीला देण्यात आलेली आयकरातील सूट आणि आरबीआयनं रेपो रेटमधील केलेली कपात यामुळं देशातील ग्राहकांकडून मागणी वाढल्यानं अर्थव्यवस्था वाढीला प्रोत्साहन मिळेल.
केंद्र सरकारनं 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करताना आयकरातील सवलत 7 लाख रुपयांवरुन 12 लाखांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळं देशातील मध्यमवर्गाला 1 लाख कोटी रुपयांची कर सवलत मिळाली आहे. याशिवाय आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात करत 5.5 टक्क्यांवर आणला होता.
22 सप्टेंबरपासून 375 वस्तूंवरील जीएसटीच्या दरात कपात करण्यात आली आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर कमी झाले आहेत. एस अँड पीनं म्हटलं की अमेरिकेनं भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादलं आहे. त्याचा निर्यातीवर परिणाम होतोय. मात्र, येत्या काळात अमेरिका भारतीय उत्पादनांवर लावलेलं टॅरिफ कमी करेल अशी शक्यता आहे.
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के म्हणजेच एकूण 50 टक्के आयात शुल्क लादलं होतं. भारतातून अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर ते शुल्क आकारलं जात होतं. भारतातील काही कंपन्यांनी तेल खरेदी बंद केल्यानं ट्रम्प निर्णय बदलतात का ते पाहावं लागेल.
आणखी वाचा
Comments are closed.