होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीसाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही, हिंदुस्थानची भूमिका
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे. या महत्त्वाच्या सागरी मार्गावरून प्रवास करण्यासाठी कोणत्याही देशाच्या परवानगीची आवश्यकता नाही, असे सरकारने मंगळवारी स्पष्ट केले. इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे या भागात हिंदुस्थानी जहाजे अडकल्याच्या आणि त्यांच्या सुटकेसाठी कराराची गरज असल्याचे सातत्याने येत होते. मात्र, सरकारने या वृत्ताचे खंडन केले असून आंतरराष्ट्रीय नियमांनुसार येथे वाहतुकीचे पूर्ण स्वातंत्र्य असल्याचे सांगितले आहे.
बंदर आणि जहाजबांधणी मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, होर्मुझ सामुद्रधुनी अरुंद असल्यामुळे केवळ प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग निश्चित केलेले आहेत, ज्यांचे पालन सर्व जहाजांना करावे लागते. जहाजांच्या सुरक्षिततेसाठी किंवा प्रवासासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा सुरक्षा रक्कम भरली जात नाही. जहाजांच्या वाहतुकीचा निर्णय हा पूर्णपणे संबंधित कंपन्या आणि त्यांच्या सुरक्षा अटींवर अवलंबून असतो, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सध्या या परिसरात हिंदुस्थानची अनेक जहाजे सुरक्षित आहेत. यामध्ये 2.3 लाख टन एलपीजी वाहून नेणारी पाच जहाजे, कच्चे तेल, रसायने आणि कंटेनर वाहून नेणाऱ्या इतर जहाजांचा समावेश आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे निर्माण झालेला अडथळा दूर होत असून, काही जहाजे नियमित देखभालीसाठी ड्राय डॉक मध्ये आहेत. हिंदुस्थानसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. देशातील 58-95 टक्के एलपीजी आणि 30 टक्के गॅसचा पुरवठा याच मार्गाने होतो.
कच्च्या तेलाच्या बाबतीत हिंदुस्थानने रशिया, अमेरिका आणि पश्चिम आफ्रिकेसारख्या पर्यायी स्रोतांकडून पुरवठा करून परिस्थिती हाताळली आहे. मात्र, गॅस आणि एलपीजीच्या पुरवठ्यात काही प्रमाणात कपात जाणवत आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून पर्यायी मार्गांचा विचारही केला जात असल्याचे सरकारचे स्पष्ट कले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘पाइन गॅस’ आणि ‘जग वसंत’ ही दोन मोठी एलपीजी जहाजे होर्मुझची सामुद्रधुनी पार करून हिंदुस्थानकडे रवाना झाली आहेत. 26 आणि 27 मार्चपर्यंत ही जहाजे कांडला आणि न्यू मंगलौर बंदरात पोहोचतील. पश्चिम आशियातील तणावानंतर अडकलेल्या 22 हिंदुस्थानी जहाजांपैकी ही महत्त्वाची जहाजे आता मायदेशी परतत आहेत.
Israel Iran War – अमेरिकेने निर्बंध हटवले, इराणने तेलखरेदीची दिली ऑफर; हिंदुस्थानची महत्त्वाची अट
Comments are closed.