गोलपोस्टचा लढवय्या रक्षक गेला… दिग्गज हॉकीपटू मॅन्युअल फ्रेडरिक यांचे निधन

कधी कधी एखादा खेळाडू केवळ चेंडू अडवत नाही तर तो काळ थांबवतो. हिंदुस्थानी हॉकीच्या इतिहासातील असाच एक लढवय्या आणि गोलपोस्टचा रक्षक मॅन्युएल फ्रेडरिक यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदुस्थानी हॉकी जगताने गोलपोस्टचा लढवय्या रक्षक गमावला.

1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये गारठलेल्या मैदानावर हिंदुस्थानी हॉकीला कांस्यपदक मिळवून देणारे गोलरक्षक फ्रेडरिक हे  त्या काळातले ‘रॉकस्टार ऑफ डिफेन्स’ होते.

त्यांच्या हातातले ग्लोव्हज म्हणजे चेंडूंसाठी लोखंडाची भिंतच! चेंडू पुठून येतोय हे ओळखण्याचे त्यांच्याकडे जणू सिक्स्थ सेन्सच होते. ते फक्त गोलकीपर नव्हते. ते हिंदुस्थानी संघाच्या आत्मविश्वासाचे रक्षकही होते. मैदानात शेवटच्या क्षणी जर पुणावर विश्वास ठेवला जायचा तर ते होते फ्रेडरिक यांच्यावर.

गेल्या दहा महिन्यांपासून ते पॅन्सरशी झुंज देत होते. जसे ते पेनल्टी कॉर्नरवर उभे राहायचे तसेच ते डोळय़ांत लक्ष, चेहऱ्यावर निश्चय,  तोच आत्मविश्वास दाखवत शेवटच्या दिवसापर्यंत जगले, झुंजले. पण शेवटी… आयुष्याचा स्कोअरबोर्डही बंद झाला. वयाच्या 78व्या वर्षी हे लढवय्ये रक्षक आपल्यातून निघून गेले.

केरळच्या कन्नूर जिह्यातील बर्नासिरी गावात 20 ऑक्टोबर 1947 रोजी त्यांचा जन्म झाला. पुढे हिंदुस्थानसाठी पदक जिंकणारे केरळमधील पहिले ऑलिम्पिक खेळाडू होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यांच्या खेळात एक वेगळी शिस्त, एक सौंदर्य आणि एक ठाम विश्वास होता. 2019 मध्ये हिंदुस्थानी सरकारने त्यांना ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित केले होते. हा पुरस्कार म्हणजे फक्त सन्मान नव्हता तो एका शांत, स्थिर, पण कणखर योद्धय़ाला दिलेला स्टँडिंग ओव्हेशन होता.

सर्वोत्तम गोलरक्षक

‘मॅन्युएल प्रेडरिक हे हिंदुस्थानातील सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक होते. हिंदुस्थान हॉकीच्या सुवर्णयुगात त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या कामगिरीने अनेक तरुणांना देशाचे प्रतिनिधित्व करण्यास प्रेरित केले. हॉकी इंडिया त्यांच्या पुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त करते. आपण एक महान खेळाडू गमावला आहे, परंतु त्यांचा वारसा कायमचा जिवंत राहील, असे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिकाa म्हणाले.

Comments are closed.