हिंदुस्थानी महिलांचा थायफाय विजय, थायलंडची 11-0 ने उडवली धूळधाण

हांगझोऊ (चीन), दि. 5 (वृत्तसंस्था) – हिंदुस्थानच्या पुरुष संघाप्रमाणे महिला संघानेदेखील ‘आशिया कप 2025’ हॉकी स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली आहे. सलामीच्या लढतीत हिंदुस्थानच्या महिला संघाने थायलंड संघाला अक्षरशः लोळवले असून, 11-0 असा धुव्वा उडवत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे.
चीनमधील हांगझोऊच्या गोंगशू जिह्यातील पॅनॉल स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर ‘ब’ गटात खेळवल्या गेलेल्या या सामन्यात हिंदुस्थान महिला हॉकी संघ दिग्गज गोलकीपर सविता पुनिया आणि ड्रग फ्लिकर दीपिका यांच्या शिवाय मैदानात उतरला होता. दोन्ही प्रतिभावान खेळाडू दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकल्या असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानी महिला संघाच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, पहिल्याच सामन्यात 11-0 असा मोठा विजय मिळवून हिंदुस्थानच्या महिला संघाने स्पर्धेतील आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत.
हिंदुस्थान महिला संघाकडून उदिता दुहान आणि ब्यूटी डुंग डुंग या दोघींनी प्रत्येकी 2-2 गोल केले. उदिताने 30 व्या आणि 52 व्या मिनिटात पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतरित केले. डुंग डुंग हिने 45 व्या आणि 54 व्या मिनिटात संघासाठी दोन गोल डागले. मुमताज खान हिने संघाला 7 व्या मिनिटाला खाते उघडून दिले. अवघ्या काही वेळातच संगीता कुमारी हिने दहाव्या मिनिटाला गोल डागत ही आघाडी 2-0 अशी केली. 16 व्या मिनिटाला नवनीत काwर आणि 18 व्या मिनिटाला लालरेम्सियामी हिने गोल डागला. थौदाम सुमन देवी (49 व्या मिनिटाला), शर्मिला देवी (57 व्या मिनिटाला) आणि रुताजा पिसल यांनीही (60 व्या मिनिटा) प्रत्येकी 1-1 गोल डागत संघाला मोठा विजय मिळवून दिला.
पहिल्या हाफमध्ये सामन्यावर पकड
हॉकीच्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या हिंदुस्थानी महिला संघाने या सामन्यात सुरुवातीपासून पकड मजबूत केली होती. पहिल्या हाफमध्ये हिंदुस्थानच्या महिला संघाने आक्रमक खेळ करत 5-0 अशी आघाडी मिळवली होती. त्यामुळे पहिल्या हाफमध्येच सामन्याचा निकाल स्पष्ट झाला होता. शेवटपर्यंत एकही गोल न करू देता हिंदुस्थानी संघाने प्रतिस्पर्ध्याला शून्यावर ठेवत स्पर्धेची सुरुवात धमाक्यात केली.
यंदा महिला आशिया कप स्पर्धेत 8 संघ सहभागी असून दोन गटात संघांची विभागणी केली आहे. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ सुपर-4 साठी पात्र ठरणार आहेत. यातील दोन अव्वल संघ 14 सप्टेंबरला फायनल खेळतील. हिंदुस्थानी महिला संघाने पहिला सामना जिंकत सुरुवात दणक्यात केली आहे. आता हिंदुस्थानी महिला संघापुढे शनिवारी (दि. 6) जपानचे तगडे आव्हान असणार आहे, तर त्यानंतर अखेरच्या साखळी सामन्यात 8 सप्टेंबरला हिंदुस्थानी महिला संघ सिंगापूर विरुद्ध भिडणार आहे.
Comments are closed.