छातीत दुखत असलेल्या रुग्णाला 8 तास वाट बघायला लावली, अखेर कुटुंबासमोर तडफडत सोडले प्राण

कॅनडामध्ये एका हिंदुस्थानी वंशाच्या व्यक्तीची वेळेत उपचार न मिळाल्याने त्या रुग्णालयातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रशांत श्रीकुमार असे त्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयाने उपचाराअभावी आठ तास तिष्ठत ठेवले होते असा आरोप त्यांचे वडील कुमार श्रीकुमार यांनी केला आहे.
22 डिसेंबर रोजी प्रशांत यांना ते ऑफिसमध्ये असतानाच छातीत दुखू लागले होते. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना ग्रे नन हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. तिथे सुरुवातीला त्यांचा ईसीजी काढला व त्यांना वेटिंग रुममध्ये थांबायला सांगितले. त्यावेळी कुमारने त्याच्या वडीलांना सांगितले की मला हे दुखणे सहन होत नाहीए तुम्ही यांना माझ्यावर उपचार करायला सांगा.
प्रशांत यांनी हॉस्पिटलच्या स्टाफला 10 ते 15 वेळा याबाबत सांगितले. मात्र त्यांनी ईसीजी रिपोर्टमध्ये काहीही आढळले नाही असे सांगितले व त्याला एक टायलेनॉल दिले व त्यानंतर त्या निघून गेल्या. असे तब्बल 8 तास प्रशांत छातीत दुखत असताना उपचार न घेता रुग्णालयाच्या वेटिंग एरियामध्ये बसून होता. अखेर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रशांत यांच्या पश्चात आई वडील, पत्नी व दोन मुलं आहेत.

Comments are closed.