हिंदुस्थानी तिरंदाजांचा सुवर्णविजय, फ्रान्सवर मात करून कंपाऊंड तिरंदाजीत सोनेरी यश

हिंदुस्थानी पुरुष कंपाऊंड तिरंदाजी संघाने रविवारी विश्वचषकात इतिहास रचला. अंतिम सामन्यात फ्रान्सवर मात करून हिंदुस्थानला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.
ज्योती सुरेखा वेन्नम आणि ऋषभ यादव यांच्या जोडीला मिश्र दुहेरीत नेदरलँड्सविरुद्ध 155-157 असा पराभव पत्करावा लागला आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, मात्र 23 वर्षीय ऋषभने लगेचच दमदार पुनरागमन केले. अमन सैनी आणि प्रथमेश फुगे यांच्या साथीने त्याने पुरुष संघाला विजेतेपद मिळवून दिले.
फ्रान्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात तीन फेऱ्यांनंतर स्कोर 176-176 असा बरोबरीत होता. पण निर्णायक टप्प्यात दुसऱ्या मानांकित हिंदुस्थानी संघाने विलक्षण संयम दाखवत 59 गुणांची कमाई केली, तर फ्रान्सला केवळ 57 गुणांवर रोखले. या अप्र्रतिम प्रदर्शनामुळे हिंदुस्थानने 235-233 अशी रोमांचक विजयश्री संपादन केली.
फायनलपर्यंतच्या प्रवासात हिंदुस्थानी संघाने ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि तुर्की यांना पराभवाचा धक्का देत आपले वर्चस्व सिद्ध केले. या ऐतिहासिक विजयामुळे तिरंदाजीला नवे बळ मिळाले असून हिंदुस्थानी तिरंदाजांनी जगभरात आपली ताकद ठसवली आहे.
Comments are closed.