भारतीय नौदलाने जपानी खलाशाचे प्राण वाचवले
समुद्राच्या मध्यभागी 200 किमी अंतरावर बचाव मोहीम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदलाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मानवतावादी सहकार्य आणि त्वरित कारवाईचे प्रदर्शन घडवताना समुद्राच्या मध्यभागी अडकलेल्या एका गंभीर आजारी असलेल्या जपानी खलाशाचे प्राण वाचवले आहेत. 14 फेब्रुवारी रोजी सुमारे 200 किमी अंतरावर तैनात असलेल्या जपान मेरीटाईम सेल्फ-डिफेन्स फोर्सच्या युद्धनौकेकडून वैद्यकीय स्थलांतरासाठी आपत्कालीन विनंती प्राप्त झाली. यानंतर भारतीय नौदलाने वेळ वाया न घालवता बचावकार्य सुरू केले.
भारतीय नौदलाने विशाखापट्टणम येथील आयएनएस देगा येथून सी किंग हेलिकॉप्टर पाठवले. आव्हानात्मक समुद्री परिस्थितीचा सामना करत हेलिकॉप्टर जपान मेरीटाईम सेल्फ-डिफेन्स फोर्सच्या जहाजावर पोहोचल. त्यानंतर गंभीर आजारी असलेल्या खलाशाला सुरक्षितपणे एअरलिफ्ट करत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
‘एअरलिफ्ट’नंतर रुग्णालयात उपचार
बचाव केल्यानंतर हेलिकॉप्टरने रुग्णाला सुरक्षितपणे आयएनएस देगा येथे नेले. तेथून, खलाशाला तातडीने पुढील उपचारांसाठी कल्याणी नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तज्ञ डॉक्टरांची एक टीम त्याच्यावर उपचार करत आहे. नौदल सूत्रांनुसार, वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्याने रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
ही कारवाई केवळ यशस्वी वैद्यकीय स्थलांतरच नाही तर भारत आणि जपानमधील वाढत्या धोरणात्मक आणि सागरी सहकार्याचे प्रतीक देखील आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात दोन्ही देशांमधील सहकार्य सातत्याने मजबूत झाले असून नियमित नौदल सराव, माहितीची देवाणघेवाण आणि मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहिमांमध्ये दोन्ही देश एकमेकांना मदत व सहकार्य करत असतात.
नौदलाची प्रत्येकवेळी मदतीला धाव
भारतीय नौदलाने गेल्या काही वर्षांत अनेक आंतरराष्ट्रीय बचाव आणि मानवतावादी मोहिमा यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. चाचेगिरीविरोधी मोहिमा असोत, नैसर्गिक आपत्तींदरम्यान मदतकार्य असोत किंवा परदेशी नागरिकांना मदत करणे असो, नौदलाने जागतिक सुरक्षा भागीदार म्हणून आपली भूमिका सातत्याने पार पाडली आहे. आताची नव्याने घडलेली ही घटनाही या संकटकालीन मदतीचाच एक भाग ठरली आहे.
Comments are closed.