'वोकल फॉर लोकल'च्या माध्यमातून जगभरात भारतीय उत्पादने

पंतप्रधानांची ‘मन की बात’ : सणासुदीत स्वदेशी वस्तूंच्या खरेदीचे आवाहन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पंतप्रधान मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाला संबोधित करताना स्वदेशी वस्तूंचे जोरदार समर्थन केले. ‘व्होकल फॉर लोकल’च्या माध्यमातून देशी उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचत असल्याचा दावा केला. या सणासुदीच्या काळात तुमच्या आजूबाजूला एक बदल तुमच्या लक्षात आला असेल. खरेदी करताना लोक आता देशी उत्पादनांना अधिक महत्त्व देत आहेत. ‘व्होकल फॉर लोकल’ची ही भावना आपली उत्पादने जगभरातील बाजारपेठांमध्ये घेऊन जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी बिहारमधील मखाना आणि कर्नाटकातील तूर डाळ यांना जगभरात नवीन बाजारपेठा मिळत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत आणि परदेशातील लोकांशी आपले विचार मांडले. रविवार, 25 ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेला या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 139 वा भाग होता. याप्रसंगी ‘मन की बात’ कार्यक्रम हा तीर्थयात्रेसारखा असल्याचेही मोदी म्हणाले. याप्रसंगी त्यांनी कापूस लागवडीच्या महत्त्वावरही भर दिला. पंजाबमध्ये ‘खेती विरासत मिशन’ नावाच्या संस्थेने सेंद्रिय आणि पारंपरिक शेती पद्धतींचे पुनरुज्जीवन करण्यास सुरुवात केली आहे. या टीमला पंजाबच्या माळवा प्रदेशात नैसर्गिक कापूस शेतीला प्रोत्साहन द्यायचे होते. या उपक्रमाला ‘नव-त्रिंजन’ असे नाव देण्यात आले आहे.

पॅकेजिंगवर आदिवासी कला

महाराष्ट्रातील आदिवासी समुदायांनी त्यांच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगकडे खूप लक्ष दिले आहे. ‘शबरी नॅचरल्स’च्या माध्यमातून मध, महुआ, पाइन आणि बांबूपासून बनवलेली उत्पादने बाजारात आणली जात आहेत. त्यांच्या पॅकेजिंगवर आदिवासी कलाकुसर सादर केली जाते. या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाइन अवॉर्ड’ मिळाल्याबाबत पंतप्रधानांनी या सर्व टीमचे विशेष अभिनंदन केले.

सणासुदीत स्वच्छता मोहीम

दिवाळी आणि छठपूजा हे पवित्र सण अवघ्या काही दिवसांवर आले आहेत. सर्वत्र स्वच्छता मोहीम सुरू केली जात आहे. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे. आपल्या लहान प्रयत्नांमुळे आपल्या सभोवताली मोठे बदल घडू शकतात, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

नैसर्गिक जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनावर भर

‘मन की बात’च्या 139 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलस्त्रोतांच्या पुनरुज्जीवनावरही भर दिला. उत्तराखंडच्या टिहरी गढवाल भागातील लोक हेवाल नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एकत्र आले आहेत. काही काळापूर्वी हेवाल नदीची पाण्याची पातळी कमी होऊ लागली होती. जवळचे नैसर्गिक जलस्रोतही कोरडे पडत होते. याला प्रतिसाद म्हणून स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांनी नदी वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून पावसाचे पाणी साठवणे, भूजल पुनर्भरण करणे आणि मोठ्या संख्येने झाडे लावण्याचे उपाय योजण्यात आले. आज या प्रयत्नांमधून हेवाल नदीचे पुनरुज्जीवन होऊन अनेक नैसर्गिक जलस्रोत पुनर्संचयित झाल्याचे उदाहरण पंतप्रधानांनी दिले.

 

Comments are closed.