72th senior national kabaddi champoionship – रेल्वेची विजेतेपदावर मोहोर, महाराष्ट्र उपविजेता!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

वडोदरा येथील सामा इंडोर स्टेडियममध्ये पार पडलेल्या ७२व्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेवर हिंदुस्थानी रेल्वेने आपले नाव कोरले आहे. रंगतदार झालेल्या अंतिम सामन्यात रेल्वेने महाराष्ट्राचा ४९-३१ असा १८ गुणांच्या फरकाने पराभव करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

सुनील कुमारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रेल्वे संघाने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली. चढाईपटू पंकज मोहितेने सर्वाधिक १२ गुण मिळवून विजयाचा पाया रचला, तर अशू मलिकने ८ गुणांची मोलाची भर घातली. रेल्वेच्या बचावफळीने (डिफेन्स) प्रभावी कामगिरी करत १४ टॅकल गुण मिळवले. महाराष्ट्राकडून अस्लम इनामदार आणि शिवम पाटरे यांनी झुंज दिली, मात्र रेल्वेच्या आक्रमक खेळासमोर त्यांचा निभाव लागला नाही.

उपांत्य फेरीचा प्रवास

महाराष्ट्राने पहिल्या उपांत्य सामन्यात उत्तर प्रदेशचा ४९-३६ असा धुव्वा उडवला होता. यात आदित्य शिंदे (१२ गुण) आणि असलम इनामदार (११ गुण) चमकले होते. तर दुसरीकडे रेल्वेचा उपांत्य सामना कमालीचा अटीतटीचा झाला. निर्धारित वेळेत सामना ३८-३८ असा बरोबरीत सुटल्यानंतर, टाय-ब्रेकरमध्ये रेल्वेने ७-४ ने विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

राजपूत-शुभमची दमदार कामगिरी

दरम्यान, स्पर्धेत गोव्याच्या भवानी राजपूतने ५८ गुणांसह चढाईत (रेडिंग) अव्वल स्थान पटकावले, तर रेल्वेच्या शुभम शिंदेने सर्वाधिक २७ टॅकल गुणांची कमाई करत सर्वोत्तम बचावपटू म्हणून आपली छाप पाडली.

Comments are closed.