भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, कन्फर्म तिकीट रद्द केल्यास किती रिफंड मिळणार, रेल्वेनं नियम बदलले

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेनं कन्फर्म तिकीट रद्द केल्यानंतर प्रवाशांना किती रक्कम परत द्यायची यासंदर्भातील नवे नियम जारी केले आहेत. नव्या नियमानुसार एखाद्या प्रवाशाकडे कन्फर्म तिकीट असेल आणि त्यानं ट्रेन सुटण्यापूर्वी  24 ते 72 तासांच्या काळात तिकीट रद्द केल्यास त्यानं तिकिटासाठी मोजलेल्या रकमेपैकी 25 टक्के रक्कम कपात करुन राहिलेली रक्कम त्याला दिली जाईल. ट्रेन सुटण्यापूर्वी 8 तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास रिफंड दिला जाणार नाही.

कन्फर्म तिकीट रद्द करण्यासंदर्भातील नियम (Train Ticket Refund New Rules)

1. एखाद्या प्रवाशाकडे रेल्वे प्रवासासाठी आरक्षित केलेलं कन्फर्म तिकीट असेल आणि त्यानं ती ट्रेन सुटण्यापूर्वी 72 तासांच्या अगोदर तिकीट रद्द केलं तर त्याला अधिकाधिक रक्कम दिली जाईल. यातून प्रति प्रवासी फक्त किमान तिकीट रद्द फी वजा केली जाईल.

2. तुमच्याकडे ट्रेनचं कन्फर्म तिकीट असेल आणि तुम्ही ट्रेन सुटण्यापूर्वी 72 ते 24 तासांच्या कालावधीत ते तिकीट रद्द केल्यास तिकीट दराच्या 25 टक्के रक्कम किमान शुल्क म्हणून वजा करुन राहिलेली रक्कम प्रवाशाला परत केली जाईल.

3. ट्रेन सुटण्यापूर्वी प्रवाशानं 24 ते 8 तासांच्या कालावधीत तिकीट रद्द केल्यास तिकीटाच्या 50 टक्के रक्कम वजा केली जाईल आणि राहिलेली रक्कम प्रवाशाला दिली जाईल.

4. जर तुम्ही ट्रेन सुटण्यापूर्वी  8 तासांच्या कालावधीत तिकीट रद्द केलं तर कोणत्याही प्रकारची रक्कम परत दिली जाणार नाही.

रेल्वे तिकीट रद्द करण्यासंदर्भातील प्रक्रिया

तुम्ही जर तिकीट एखाद्या रेल्वे स्टेशनच्या काऊंटरवरुन तिकीट बुक केलं असेल तर रेल्वे प्रवास संपणाऱ्या स्टेशनला रद्द करावं लागत होतं. आता मात्र,  कणत्याही स्टेशनवर तिकीट रद्द करु शकता. ई तिकीट काढणाऱ्यांना यापूर्वी ऑनलाईन टीडीआर फाईल करावा लागायचा. आता टीडीआर फाईल करावा लागणार नाही, ऑटोमेटिक रिफंड जमा केला जाईल.

बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी देखील आता ट्रेन निघण्यापूर्वी 30 मिनिटांपर्यंत देण्यात आली आहे. ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी ही सुविधा देण्यात आली आहे. रेल्वे तिकीट रिफंड संदर्भातील नियम 1 ते  15 एप्रिल दरम्यान लागू केले जाऊ शकतात.

दरम्यान, भारतीय रेल्वेकडून तिकीट आरक्षित करण्यासंदर्भातील नियमांमध्ये देखील यापूर्वी मोठे बदल करण्यात आले आहेत. रेल्वेच्या नियमानुसार 60 दिवसांच्या कालावधीसाठी रेल्वे तिकीट बुक करता येते. याशिवाय रेल्वे तिकीट बुकिंग सुरु झाल्यानंतर सुरुवातीचा काही वेळ आधार प्रमाणीकरण केलेल्या प्रवाशांसाठी राखीव करण्यात आले आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.