आता रेल्वे प्रवास महागणार, भारतीय रेल्वे 1 जुलैपासून AC आणि नॉन AC तिकीट दर वाढवणार?
भारतीय रेल्वे नवी दिल्ली : तुम्ही जर रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. पुढील महिन्यात रेल्वे प्रवाशांना एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करायचा असेल तर अधिक पैसे मोजावे लागू शकतात. भारतीय रेल्वेनं करोनाच्या काळानंतर पहिल्यांदा रेल्वेच्या प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त द इकोनॉमिक टाइम्सनं सूत्रांच्या आधारे दिलं आहे. रेल्वे प्रवास भाड्यात किरकोळ वाढ होणार असून ती 1 जुलैपासून लागू केली जाणार असल्याची माहिती आहे.
द इकोनॉमिक टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार नॉन एसी मेल आणि एक्स्प्रेस ट्रेनच्या प्रवास भाड्यात 1 पैसे प्रति किलोमीटर वाढ होणार आहे. एसी क्लाससाठी प्रवास भाड्यात 2 पैसे प्रति किलोमीटर वाढ होणार आहे. मात्र, 500 किलोमीटरपर्यंतच्या उपनगरीय तिकीट किंवा सेकंड क्लासच्या प्रवास भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. 500 किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या प्रवासासाठी दरवाढ लागू असेल. मासिक सीझन पासच्या तिकीटामध्ये वाढ करण्यात आलेली नाही.
1 जुलैपासून तिकीट दर कसे बदलणार?
उपनगरीय प्रवास भाड्यात कोणतीही वाढ नाही.
मासिक सीझन तिकीटाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सेकंड क्लास प्रवासासाठी 500 किलोमीटरपर्यंत प्रवास भाडेवाढ लागू होणार नाही.
सेकंड क्लास 500 किलोमीटर पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी प्रति किलोमीटर 0.50 पैसे भाढेवाढ लागू होईल.
मेल आणि एक्सप्रेस नॉन एसीप्रवास भाडं 1 पैसे प्रति किलोमीटर वाढेल.
एसी मधील प्रवासभाडं 2 पैसे प्रति किलोमीटरनं वाढेल.
तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक
भारतीय रेल्वेनं तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक केलं आहे. त्यानुसार 1 जुलै 2025 पासून आधार प्रमाणीकरण पूर्ण असलेल्या खात्यांमधून तात्काळ तिकीट बुक करता येणार आहे. रेल्वे मंत्रालयानं यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना 10 जून 2025 पासून जारी केल्या आहेत. तात्काळ तिकीट सर्वसामान्य प्रवाशांना मिळावं म्हणून हे बदल करण्यात आले आहेत.
तात्काळ तिकीट बुकिंग सुरु होताच पहिल्या काही मिनिटांमध्ये ती संपून जायची. त्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांना तिकीट मिळत नव्हतं. त्यामुळं रेल्वेकडून तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. 1 जुलैपासून तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण आधारित ओटीपी पडताळणी आवश्यक असेल. 1 जुलै 2025 पासून तात्काळ तिकीट बुकिंग करण्यासाठी आधार प्रमाणीकरण लागू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली होती. रेल्वेनं लागू केलेला हा नियम ऑनलाईन बुकिंग, काऊंटर बुकिंग आणि एजंटद्वारे केल्या जाणाऱ्या बुकिंगसाठी लागू असेल.
आणखी वाचा
Comments are closed.