2021 वर्ल्डकप नंतर जीवाला धोका, धमक्यांचे फोन! वरुण चक्रवर्तीचा खुलासा
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली. तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने फक्त तीन सामन्यात नऊ विकेट्स घेतल्या. मात्र, गेले काही वर्ष वरुणसाठी खूप कठीण गेले आहे. वरुणने त्याच्या वाईट काळाची आठवण करून दिली आहे आणि सांगितले आहे की 2021 च्या टी20 विश्वचषकातील त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला फोनवरून धमक्या येत होत्या. वरुण म्हणाला की त्याला भारतात परत येऊ नये अशी ताकीद देण्यात आली होती, त्याच्या घरापर्यंत त्याचा पाठलाग करण्यात आला.
2021 च्या टी20 विश्वचषकात खराब कामगिरीनंतर वरुण चक्रवर्तीला संघातून वगळण्यात आले आणि त्याला वाटले की त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द जवळजवळ संपली आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या या फिरकी गोलंदाजाने जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत पदार्पण केले, नंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टी20 विश्वचषक संघात स्थान मिळवले. वरुण चक्रवर्तीने भारतासाठी तीन सामने खेळले पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.
वरुण चक्रवर्तीने एका यूट्यूब शोमध्ये सांगितले की, 2021 च्या विश्वचषकानंतरचा काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. त्याला नैराश्य आले होते, कारण तो विश्वचषकात चांगला प्रदर्शन करू शकला नाही आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यामुळे त्याला तीन वर्षे संघात संधी मिळाली नाही. त्याच्यासाठी पुनरागमन करणे पदार्पणापेक्षा जास्त कठीण वाटले.
वरुणने पुढे सांगितले की, त्याने स्वतःमध्ये मोठे बदल केले. सरावाचा वेळ वाढवला आणि मेहनत केली, तरीही त्याची निवड होईल की नाही, याची खात्री नव्हती. तीन वर्षांनी त्याला वाटले की आता संधी मिळणार नाही. पण त्याच्या संघाने आयपीएल जिंकल्यावर त्याला भारताच्या संघात बोलावण्यात आले, आणि तो खूप आनंदी झाला.
वरुणने सांगितले की, 2021 च्या विश्वचषकानंतर त्याला धमक्या मिळाल्या. काही लोक म्हणाले की, तो भारतात परत येऊ नये. काहीजण त्याच्या घरी आले आणि त्याचा पाठलागही केला. त्यामुळे तो घाबरून गेला आणि काही काळ लपून राहावा लागला. मात्र, आता जेव्हा तो मागे वळून पाहतो आणि लोक त्याचे कौतुक करताना बघतो, तेव्हा त्याला खूप आनंद होतो.
Comments are closed.