शेअर बाजारात दिवाळी धमाका! सेन्सेक्स 411 अंकांनी, तर निफ्टी 133 अंकांनी वाढला

ऐन दिवाळीत शेअर बाजाराला अच्छे दिन आले. सोमवारी हिंदुस्थानी शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 411 अंकांनी वाढून 84,363 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 133 अंकांनी वधारून 25,843 अंकांवर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर सर्वात जास्त 3.5 टक्क्यांनी वाढले. श्रीराम फायनान्स, सिपला, बजाज फिनसर्व, इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, टीसीएस आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्सही चांगले वाढले. यात दोन टक्क्यांपर्यंत वाढ दिसली, तर दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये 3 टक्के घसरण दिसली.

अल्ट्राटेक सिमेंट, इटर्नल, महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी पोर्टस्, पॉवर ग्रीड, ट्रेंट आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये घसरण झाली. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, विदेशी गुंतवणूकदारांनी शुक्रवारी 308.98 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले होते.

आज मुहूर्त ट्रेडिंग

दरवर्षी हिंदुस्थानी शेअर बाजारात दिवाळीनिमित्त विशेष मुहूर्त ट्रेडिंग सेशन आयोजित केले जाते. या वर्षी उद्या, 21 ऑक्टोबरला मुहूर्त ट्रेडिंग केले जाणार आहे. उद्या दुपारी 1.45 वाजेपासून 2.45 वाजपर्यंत मुहूर्त ट्रेडिंग चालेल, तर प्री ओपनिंग सेशन दुपारी 1.30 वाजेपासून 1.45 वाजेपर्यंत राहील. हा मुहूर्त ट्रेडिंग संपल्यानंतर 21 आणि 22 ऑक्टोबरला बीएसई आणि एनएसई दोन दिवस बंद राहील. 23 ऑक्टोबरला शेअर बाजार नेहमीच्या वेळेला खुला होईल.

गुंतवणूकदारांनी कमावले 2.79 लाख कोटी

शेअर बाजारात जबरदस्त वाढ झाल्याने गुंतवणूकदारांची चांदी झाली. सोमवारी गुंतवणूकदारांनी 2.79 लाख कोटी रुपयांची कमाई केली. 17 ऑक्टोबरला शेअर बाजार बंद झाला त्या वेळी बीएसई लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 4,66,92,713 कोटी रुपये होते. सोमवारी बाजार बंद झाला त्या वेळी लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप वाढून 4,69,71,968 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

Comments are closed.