Iran Israel War – इराणमध्ये अडकले हिंदुस्थानी विद्यार्थी, मदतीसाठी सरकारकडे याचना
इराण-इस्रायल युद्ध सुरु झाल्याने, सुमारे १० हजार ते १५ हजार हिंदुस्थानी विद्यार्थी अडकले आहेत. हे विद्यार्थी मुख्यतः तेहरान, शिराझ आणि इतर इराणी शहरांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्यांचे कुटुंब हिंदुस्थानात आहे आणि सध्या त्यांची चिंता खूप आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, युद्धामुळे त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. एनडीटीव्हीशी बोलताना, मीर सलिस यांनी सांगितले की बॉम्ब फक्त १०० मीटर अंतरावर पडत आहेत. विद्यार्थ्यांनी व्हिडिओद्वारे दाखवले की त्यांच्या खोलीच्या बाहेरून धूर आणि स्फोट स्पष्ट दिसत आहेत. सर्व विद्यार्थी घाबरले आहेत आणि हिंदुस्थानात परतण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
हिंदुस्थानी दूतावास सध्या काही विद्यार्थ्यांना कोम शहरात हलवण्याचे प्रयत्न करत आहे, परंतु उर्मियामध्ये सुमारे ११० विद्यार्थी अजूनही अडकले आहेत. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, दूतावासाने त्यांना स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आहे आणि लवकरच संपर्क साधण्याचे आश्वासन दिले आहे.
यातील बहुसंख्य विद्यार्थी हे उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, मुंबई, पुणे आणि काश्मीरसह विविध भागातून आले आहेत आणि लवकरात लवकर त्यांना हिंदुस्थानात परतायचे आहे. हिंदुस्थानी दूतावासाने आधीच सूचना दिल्या आहेत की, विद्यार्थ्यांनी सुरक्षित ठिकाणी जावे. परंतु काही विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि महाग तिकिटांच्या कारणास्तव तिथे थांबणे पसंत केले आहे. सध्या तेहरान आणि शिराझमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Comments are closed.