US Visa – अमेरिकेत शिक्षणाची ओढ पण VISA चा अडथळा, हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या संख्येत एकूण 75 टक्क्यांनी घट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांसाठी व्हिसा मर्यादीत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एफ, एम आणि जे व्हिसा श्रेणींमध्ये अर्ज करणाऱ्या सर्वांना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सार्वजनिक करावे, असे अनेक नियम लागू केले. त्यामुळे परदेशात शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत लक्षणीय घट झाली. आकडेवारीनुसार, अमेरिकन विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या संख्येत एकूण 75 टक्क्यांनी घट झाली आहे.
परदेशी शिक्षणाशी संबंधित असलेल्या एजन्सींनुसार, ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक घट झाली. या महिन्यांमध्येच सुमारे 70 टक्के नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश होतात. मात्र ट्रम्प यांच्या आदेशामुळे गेल्या वर्षी खूप कमी विद्यार्थी अमेरिकेत प्रवास करू शकले. अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर स्लॉट्स मिळू शकले नाहीत. ज्यामुळे त्यांना त्यांच्या योजना पुढे ढकलाव्या लागल्या.
व्हिसा नियमांमुळे समस्या वाढली
टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत अर्ज पूर्ण करणारे विद्यार्थीच पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरले. पहिल्यांदाच इतकी लक्षणीय घट दिसून आली आहे. व्हिसा तपासणी पूर्वीपेक्षा अधिक कडक झाली. ज्यामुळे व्हिसा नाकारण्याचे प्रमाण वाढले आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी झाला, असे हैदराबादमधील एका व्हिसा एजन्सीचे संचालकांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीवरही बंदी घातल्यामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत अधिक घट झाली. अमेरिकेत आधीच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आणखी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2025 पर्यंत जवळजवळ ८ हजार विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांना अचानक ईमेल आले. ज्यात त्यांचा एफ-1 व्हिसा रद्द करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे त्यांना काही आठवड्यांत देश सोडावा लागला.

Comments are closed.