साताऱ्यात रंगणार हिंदकेसरीचा आखाडा! देशभरातील 800 मल्लांचा सहभाग

क्रीडामहर्षी साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्ताने भारतीय शैली कुस्ती महासंघाच्या मान्यतेने सातारा येथील राजेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने दि. 20 ते 23 नोव्हेंबर दरम्यान सातारा येथे पुरुष आणि महिला अजिंक्यपद हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आठशे मल्ल आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.

भारतीय शैली कुस्ती महासंघाचे महासचिव गौरव सचदेवा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अर्जुन ऍवॉर्ड विजेते गयन सिंग, पैलवान बारणे, खोपडे, दीपक पवार, सुधीर पवार आदी उपस्थित होते. 85 किलो ते 140 किलो गटात होणाऱया या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास थार जीप आणि चांदीची गदा, द्वितीय क्रमांकास ट्रक्टर, तृतीय क्रमांकास बुलेट, स्प्लेंडर अशी बक्षिसे आहेत. 55, 60, 70, 75, 85 वजनी गटासाठी प्रथम क्रमांक दुचाकी, द्वितीय 50 हजार रुपये, तृतीय 20 हजार रुपये. महिला गटात 65 किलो ते 90 किलो गटात होणार असून, प्रथम क्रमांकास अल्टो, द्वितीय क्रमांकास मोपेड, तृतीय क्रमांकास 50 हजार रुपये तसेच 48, 52, 56, 62 किलो वजनी गटात प्रथम क्रमांकास मोपेड, द्वितीय 50 हजार, तृतीय 20 हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. सातारा येथे प्रथमच एवढय़ा मोठय़ा रकमेची हिंदकेसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असे सचदेवा यांनी यावेळी सांगितले.

या स्पर्धेसाठी 26 राज्यांचे पुरुष संघ, महिला संघ, सात सेवा संघ सहभागी होणार आहेत. याचबरोबर भारतीय सेना दल, वायूसेना, बीएसएफ, रेल्वेचे संघ सहभागी होणार आहेत. 500 पुरुष मल्ल आणि 250 महिला मल्ल यांचा या स्पर्धेत सहभाग आहे.

Comments are closed.