आशिया कपसाठी पहिल्यांदाच 'या' 7 भारतीय खेळाडूंना मिळाली जागा, निवड समितीने उजळले त्यांचे नशीब!
इंडिया टी -20 पथक आशिया कप: आशिया चषक 2025 साठी भारतीय टी20 संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद, तर शुबमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या टी20 संघात जसप्रीत बुमराहलाही संधी मिळाली आहे. भारतीय संघात युवा आणि अनुभवी अशा दोन्ही प्रकारच्या खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. (Asia Cup 2025 India)
भारतीय संघात असे 7 खेळाडू आहेत ज्यांना पहिल्यांदाच आशिया चषकात संधी मिळाली आहे. यामध्ये अभिषेक शर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंग यांचा समावेश आहे. हे खेळाडू पहिल्यांदाच आशिया चषक स्पर्धेत आपली चमक दाखवताना दिसतील. (India Asia Cup squad new players)
गेल्या काही काळापासून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी भारतीय टी20 संघासाठी सलामीवीर म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. संजूने भारतीय टी20 क्रिकेटमध्ये 42 सामन्यात 861 धावा केल्या आहेत, ज्यात 3 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, अभिषेकने आतापर्यंत 21 टी20 सामन्यात 535 धावा केल्या असून, त्याने 2 शतकांसह 2 अर्धशतके झळकावली आहेत.
वरुण चक्रवर्तीने 2021 मध्ये भारतीय टी20 संघात पदार्पण केले होते. सुरुवातीच्या काळात त्याला फारसे यश मिळाले नाही आणि तो संघाबाहेर गेला. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये दमदार खेळ दाखवून टी20 संघात पुनरागमन केले. चक्रवर्तीने आतापर्यंत भारतीय संघासाठी 18 टी20 सामन्यांमध्ये एकूण 33 विकेट्स घेतल्या आहेत.
आशिया चषक 2025 साठी जितेश शर्माला राखीव यष्टिरक्षक म्हणून ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर शिवम दुबे, हर्षित राणा आणि रिंकू सिंग यांनाही संघात स्थान मिळाले आहे. रिंकू खालच्या फळीत येऊन तुफानी फलंदाजी करण्यात माहिर आहे. जर तो त्याच्या लयीत असेल, तर तो काही चेंडूंमध्येच सामन्याचे चित्रच बदलू शकतो.
Comments are closed.