हिंदुस्थानी ट्रक चालकांचा गिअर फसला, ट्रम्प प्रशासनाने व्हिसा रोखले… अमेरिकेत ट्रक ड्रायव्हरच्या नोकऱ्या धोक्यात

हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावाचे बनले आहेत. अशातच अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने तत्काळ प्रभावाने सर्व व्यावसायिक ट्रक चालकांसाठी कामगार व्हिसा देणे थांबवले आहे. ही घोषणा परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी एक्सवर केली. ‘अमेरिकेच्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने परदेशी चालकांकडून चालवल्या जाणाऱ्या मोठ्या ट्रॅक्टर-ट्रेलर ट्रक्समुळे अमेरिकन लोकांचे जीव धोक्यात येत आहेत आणि अमेरिकन चालकांच्या उपजीविकेवर वाईट परिणाम होत आहे,’ असे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटले.

12 ऑगस्ट रोजी फ्लोरिडा येथे एका अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला होता. हरजिंदर सिंग या हिंदुस्थानी चालकामुळे हा भीषण अपघात झाला होता. हरजिंदर सिंग हा बेकायदेशीरपणे अमेरिकेत दाखल झाल्याचे तपासातून समजलंय. सिंग याने 2018 मध्ये मेक्सिको येथून बेकायदेशीरपणे बॉर्डर ओलांडली होती आणि कॅलिफोर्निया येथे कमर्शियल ड्रायव्हर लायसन्स मिळवले होते, अशी माहिती फ्लोरिडा हायवे सेफ्टी अँड मोटर व्हेईकल्सच्या फ्लोरिडा विभागाने दिली आहे. हरजिंदरने 12 ऑगस्ट रोजी बेदरकारपणे गाडी चालवत चुकीचा यू टर्न घेतला. त्यामुळे एक मिनी व्हॅन त्याच्या ट्रकवर धडकली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिंगला अटक झाली. तेव्हापासून बेकायदेशीर स्थलांतरितांकडून होणाऱ्या अपघातात अमेरिकन नागरिकांचा मृत्यू या विषयावरून वादंग उठले आहे. सिंग याच्यावर खटला चालवण्यात आल्यानंतर त्याला डिपोर्ट करण्यात येणार आहे.

अमेरिकन परिवहन विभागाने चालक हरजिंदर सिंग हा इंग्रजी भाषा दक्षता आणि रस्ते चिन्ह यांच्या चाचणीत पूर्ण नापास झाल्याची माहिती दिली.
अमेरिकेतील ट्रक ड्रायव्हरची नोकरी म्हणजे विदेशी नागरिकांचे आकर्षण असते. अमेरिकेत अनेक ड्रायव्हर्सना ते किती मैल वाहन चालवतात, या हिशेबाने पैसे दिले जातात. ट्रक चालक साधारण 4.2 ते 6.7 लाख रुपये दर महिना कमाई करू शकतात.

या राज्यातील प्रशासन व्यवस्था खराब आहे. ‘अजून किती निष्पाप लोकांचा जीव गेला पाहिजे जेव्हा गॅविन न्यूसम हे अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत खेळणे बंद करतील?’ अशी टीका डीएचएस असिस्टंट सेक्रेटरी ट्रिशिया मॅग्लाग्लिन यांनी केली आहे.

Comments are closed.