अनिर्णितावस्थेतही विजयाचा आनंद; गिल, जाडेजा आणि सुंदरच्या संघर्षामुळे चौथ्या कसोटीत पराभवापासून वाचलो

यजमान इंग्लंडने पहिल्या डावात तीनशेपार मिळविलेली आघाडी… दुसऱया डावात यशस्वी जैसवाल अन् साई सुदर्शन शून्यावरच बाद झाल्याने टीम इंडियाच्या गोटात पसरलेला सन्नाटा… अशा प्रतिकूल परिस्थितीत हिंदुस्थान चौथ्या कसोटीत पराभवाच्या छायेत होता. मात्र कर्णधार शुभमन गिलने झुंजार शतक आणि त्यानंतर रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हिंदुस्थानचा कसोटी आणि मालिका पराभव टाळण्यासाठी केलेला संघर्ष विजयासमान ठरला. तिघांच्या शतकांनी हिंदुस्थानला अखेर मँचेस्टर कसोटीसह मालिका वाचवण्यात यश लाभले. त्यामुळे अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा फैसला आता अखेरच्या पाचव्या कसोटीतच लागेल. फक्त हिंदुस्थानला ही ट्रॉफी जिंकता येणार नसली तरी शेवटची कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी निर्माण झाली आहे.

हिंदुस्थानला 358 धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने 669 धावांचा डोंगर उभारून पहिल्या डावात 311 धावांची मोठी आघाडी मिळविली होती. आधी गिल आणि राहुलने किल्ला लढवला आणि दोघे बाद झाल्यावर रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी पाचव्या विकेटसाठी 203 धावांची अभेद्य भागी रचत हिंदुस्थानला पराभवाच्या दाढेतून अनिर्णितावस्थेच्या कडक उन्हात आणले. जाडेजाने या मालिकेतील आपला सुपर फॉर्म कायम राखताना 107 धावा केल्या तर सुंदरने आपले पहिले शतक साकारत कसोटीच्या अनिर्णितावस्थेवर शिक्कामोर्तब केले.

त्याआधी, हिंदुस्थानने चौथ्या दिवसाच्या प्रारंभी 87 धावांवर नाबाद परतलेला राहुल आज 90 धावांवर बाद झाला अन् कसोटी वाचविण्याच्या हिंदुस्थानच्या अभियानाला जबर धक्का बसला. बेन स्टोक्सने एका अप्रतिम चेंडूवर राहुलला पायचित पकडून इंग्लंडला तिसरे यश मिळवून दिले, मात्र तोपर्यंत राहुलने शुभमन गिलच्या साथीत 188 धावांची मॅरेथॉन भागीदारी केली. दरम्यान शुभमन गिलने या मालिकेतील चौथे कसोटी शतक झळकावित कर्णधार खेळी केली, मात्र 238 चेंडूंच्या संयमी खेळीत 12 चौकारांसह 103 धावांवर तो बाद झाला अन् पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या आशांना सुरुंग लागला. आर्चरने त्याला यष्टीमागे स्मिथकडे झेल देण्यास भाग पाडले.

सुंदरजाडेजा जोडीची कमाल

गिल बाद झाल्यानंतर हिंदुस्थानचा दुसरा डाव संकटात सापडला होता, मात्र वॉशिंग्टन सुंदर व रवींद्र जाडेजा या अष्टपैलू जोडीने इंग्लंडच्या तिखट माऱयाचा प्रतिकार करीत हिंदुस्थानला आशेचा किरण दाखविला. या दोघांनीही झुंजार अर्धशतके झळकावित हिंदुस्थानला पराभवाच्या ग्रहणातून मुक्त केले. जाडेजाने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत वॉशिंग्टनला सुंदर साथ दिली.

35 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रफर्ड मैदानावर शुभमन गिलने घडवलेला पराक्रम इतिहासात नोंदवण्याजोगा ठरला. या मैदानावर यापूर्वी शेवटचे शतक 1990 मध्ये विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या
बॅटमधून आलं होतं. तब्बल 35 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गिलने शतक झळकावत त्या पराक्रमाची पुनरावृत्ती केली. विशेष म्हणजे, हिंदुस्थानी कर्णधाराकडून या मैदानावर शतक झळकवण्याचा पराक्रम मोहम्मद अझरुद्दीन याने 1990 मध्ये केला होता. त्यानंतर गिलनेच हे शतक झळकावत 35 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.

गिलचे अनेक विक्रम

शुभमन गिलने शतकी खेळीमुळे केवळ एकच नव्हे तर अनेक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केले. यशस्वी जैसवालने 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकाच कसोटी मालिकेत 712 धावा केल्या होत्या. आता गिल त्या आकडय़ालाही मागे टाकत पुढे गेला आहे. एवढंच नाही तर, डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावसकर यांच्यानंतर एका कसोटी मालिकेत 4 शतके झळकावणारा गिल हा तिसरा कर्णधार ठरला आहे. ब्रॅडमन व गावसकर यांनी ही एकाच मालिकेतील 4 शतकांची कामगिरी आपापल्या देशात केली होती. गिलने हा पराक्रम परदेशात करून दाखविला,

Comments are closed.