ऑस्ट्रेलियामध्ये हिंदुस्थानी महिलेला बीएमडब्ल्यू कारने चिरडले, पोटात होते 8 महिन्यांचे बाळ

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका भीषण कार अपघातात एका ३३ वर्षीय गर्भवती भारतीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ महिन्यांची गर्भवती समनविता धारेश्‍वर गेल्या आठवड्यात तिच्या पती आणि तीन वर्षांच्या मुलासह फिरायला जात होती.

पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री ८ वाजता हॉर्नस्बी येथील जॉर्ज स्ट्रीटजवळून धारेश्वर आणि तिच्या कुटुंबाला फूटपाथ ओलांडू देण्यासाठी किआ कार्निव्हल कारने वेग कमी केला होता, तेव्हा एका भरधाव वेगाने येणाऱ्या बीएमडब्ल्यूने तिला मागून धडक दिली. कार पार्किंगच्या प्रवेशद्वारावरून जाताना किआ कार पुढे सरकली आणि धारेश्वरला धडक दिली.

पोलिसांनी सांगितले की, या अपघातात धारेश्‍वरला गंभीर दुखापत झाली आणि तिला ताबडतोब वेस्टमीड रुग्णालयात नेण्यात आले. परंतु दुर्दैवाने तिला किंवा तिच्या पोटातील बाळाला वाचवता आले नाही. ही आलिशान बीएमडब्ल्यू १९ वर्षीय पी-प्लेटर (तात्पुरती किंवा प्रोबेशनरी लायसन्स असलेला ड्रायव्हर) आरोन पापाझोग्लू चालवत होता. बीएमडब्ल्यू आणि किआ कारचे चालक मात्र जखमी न होता बचावले,” असे पोलिसांनी सांगितले.

या अपघातात धारेश्वरचा पती आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलाला काही दुखापत झाली आहे की नाही हे अद्याप कळले नाही. धारेश्वरच्या लिंक्डइननुसार त्या आयटी सिस्टम्स विश्लेषक होत्या. तसेच त्या बिझनेस अॅप्लिकेशन अॅडमिनिस्ट्रेशन आणि सपोर्टमध्ये विशेषज्ञ देखील होत्या. अल्स्को युनिफॉर्मसाठी चाचणी विश्लेषक म्हणून काम करत होत्या.

पोलिसांनी सांगितले की, बीएमडब्ल्यू कारच्या चालकाला नंतर त्याच्या वहरूंगा येथील घरी अटक करण्यात आली. त्याच्यावर धोकादायक ड्रायव्हिंगमुळे मृत्यू, निष्काळजीपणे ड्रायव्हिंगमुळे मृत्यू आणि गर्भाचे नुकसान झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याला एका दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा जामीन नाकारला.

Comments are closed.