हिंदुस्थानी महिलांची विक्रमी ‘सुवर्ण’धाव; 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये नवा पराक्रम; तेजस शिरसेला रौप्य

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानी महिला संघाने न्यू तैपे सिटी ऍथलेटिक्स ओपन स्पर्धेतील 4 बाय 100 मीटर रिले शर्यतीत नव्या मीट विक्रमासह सुवर्णपदकावर नाव कोरले. जागतिक ऍथलेटिक्सच्या कॉन्टिनेंटल टूर सिल्व्हर श्रेणीतील या प्रतिष्ठsच्या स्पर्धेत हिंदुस्थानी धावपटूंनी पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली.

श्राबनी नंदा, एस. एस. स्नेहा, सुदेशना शिवंकर आणि तमन्ना या हिंदुस्थानच्या चौकडीने तैवानमधील बानकियाओ स्टेडियमवर 44.07 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसह हिंदुस्थानी संघाने पूर्वीचा मीट विक्रम मोडीत काढला. हिंदुस्थानने दुसऱ्या क्रमांकावरील व्हिएतनामला 0.31 सेकंदांच्या फरकाने मागे टाकत दिमाखदार विजय मिळवला.

दरम्यान, पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत हिंदुस्थानच्या तेजस शिरसेने रौप्यपदकाची कमाई केली. अत्यंत चुरशीच्या लढतीत तेजसने 13.50 सेकंदांची वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले. यापूर्वी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले होते. या स्पर्धेत त्याने स्वतःचाच 13.61 सेकंदांचा मीट विक्रम सुधारला. मात्र  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक असलेली 13.39 सेकंदांची पात्रता वेळ गाठण्यात तो अपयशी ठरला आणि त्यामुळे पात्रतेची संधी थोडक्यात हुकली.

शैली सिंहाची 'सुवर्ण'झेप

रिले शर्यतीतील यशाबरोबरच मैदानी स्पर्धांमध्येही हिंदुस्थानने चमकदार कामगिरी केली. महिलांच्या लांब उडी प्रकारात शैली सिंह हिने 6.24 मीटरची सर्वोत्तम उडी मारत सुवर्णपदक जिंकले. शैलीच्या या कामगिरीमुळे हिंदुस्थानच्या पदकतालिकेत आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली.

Comments are closed.