भारतीयांकडे हजारो टन सोने पडून आहे.
पुनर्प्रक्रिया केल्यास अर्थव्यवस्थेला मोठा हातभार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीयांना सोने या धातूचे आकर्षण सहस्रावधी वर्षांपासून आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीय शक्य तितके सोने खरेदी करण्यात गुंतलेला असतो. भारतीय संस्कृतीतही सोन्याचे अनन्यसाधारण महत्व असल्याने खरेदीला आणखीनच बळ मिळते. प्रत्येक वर्षी भारतीयांकडून नव्या शेकडो टन नव्या सोन्याची खरेदी होते. त्यामुळे देशात अनुपयोगी असे सहस्रावधी टन सोने बँक लॉकर्स, तिजोऱ्या आणि घरांमध्ये पडून आहे. ही एकप्रकारची ‘मृत गुंतवणूक’ असून या पडून राहिलेल्या सोन्याची पुनर्प्रक्रिया (रीसायकलींग) केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठाच हातभार लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना नव्या सोन्याची खरेदी अधिक प्रमाणात न करण्याचे आवाहन केले आहे. भारतात सोने प्रचंड प्रमाणात खपत असले, तरी ते भारतात निर्माण होत नाही. भारतात सोन्याच्या खाणी अत्यल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे हे सोने विदेशांमधून आयात करावे लागते. त्यासाठी बहुमोल परकीय चलन खर्च करावे लागते. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडतो. शिवाय, इतका पैसा देशाबाहेर पाठवून खरेदी केलेले हे सोने देशात पडूनच रहात असल्याने ते विकत घेण्यासाठी खर्च केलेला पैसा वाया जातो. त्यामुळे नव्या सोन्याची खरेदी करण्याच्या स्थानी जे पडून असलेले सोने आहे, त्याचेच रीसायकलींग केल्यास, विदेशी जाणारे चलन वाचेल आणि पडून असलेले सोनेही उपयोगात येईल, अशी संकल्पना आहे. म्हणून हे महत्वाचे आवाहन केले गेले.
किती सोने आहे पडून ?
भारतात किमान 32 हजार टन सोने, म्हणजेच 3 कोटी 20 लाख किलो सोने पडून आहे. ते जुने दागदागिने, जुनी नाणी, मोडलेली किंवा तुटलेली आभूषणे, बँक लॉकर्समधील साठवणूक, इत्यादी स्वरुपांमध्ये पडून आहे. काही तज्ञांच्या मते हे प्रमाण 40 हजार टन किंवा 4 कोटी किलो इतके आहे. आजच्या बाजारभावानुसार सोन्याची किंमत 1 लाख 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम किंवा दीड कोटी रुपये किलो इतकी आहे. किमान 3 कोटी किलो सोने पडून आहे, असे मानले, तरी आजच्या बाजारभावानुसार त्याची किंमत साडेचार कोटी कोटी रुपये इतकी अवाढव्य आहे. भारताचा प्रत्येक वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प जवळपास 50 लाख कोटी रुपयांचा असतो. त्याच्या 9 पट किमतीचे सोने नुसते पडून आहे. भारताचे स्थूल राष्ट्रीय उपन्न जवळपास 4 कोटी कोटी रुपये इतके आहे. त्याच्याहीपेक्षा अधिक किमतीचे सोने पडून आहे. यावरुन सोन्यात किती मोठ्या प्रमाणात ‘मृत गुंतवणूक’ किंवा डेड इन्व्हेस्टमेंट झाली आहे, याची कल्पना प्रत्येकाला येईलच.
सोन्याच्या आयातीचा खर्च किती ?
2025-2026 या, म्हणजेच गेल्या आर्थिक वर्षात भारतीयांची सोन्याची मागणी भागविण्यासाठी देशाला 72.4 अब्ज डॉलर्स, अर्थात साधारणत: 7 लाख कोटी रुपयांच्या सोन्याची आयात करावी लागली आहे. याचाच अर्थ असा की 7 लाख कोटी रुपयांचे चलन भारतातून विदेशात गेले आहे. एवढे पैसे उद्योगांमध्ये, शेतीमध्ये किंवा अन्यत्र गुंतवले गेले असते, तर या गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळाला असता आणि देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट झाली असती. पण हे पैसे सोन्यात गुंतल्याने ते पडून राहिले आहेत. कारण सोन्यातून कोणताही परतावा (रीटर्न्स) मिळत नाहीत. याचा तातडीने विचार करण्याची वेळ आता आली आहे.
सोन्याची पुनर्प्रक्रिया म्हणजे काय ?
सोन्याची पुनर्प्रक्रिया याचा अर्थ जुन्या उपयोगात नसलेल्या सोन्याचे पुन्हा शुद्धीकरण करुन त्यापासून नव्या वस्तू किंवा सुवर्णालंकार निर्माण करणे. तसे केल्यास नव्या सोन्याची खरेदी करण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे नव्या सोने आयात करण्याचे प्रमाण कमी होऊन देशाचे चलन देशाबाहेर जाण्यापासून वाचते. याचा अर्थव्यवस्थेच्या बळकटीच्या दृष्टीने लाभ होतो. जेवढे सोने पडून आहे, त्याच्या 10 टक्के सोन्याची पुनर्प्रक्रिया झाली, तरी देशाचा पैसा खूप मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे. त्यामुळे हे जास्तीत जास्त प्रमाणात होणे आवश्यक आहे. सोन्याची पुनर्प्रक्रिया होणे याचा अर्थ सोने नाहीसे होणे असा नाही. तर ते अधिक प्रमाणात व्यवहारात येणे असा आहे. याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार केले पाहिजे.
पर्यावरणाचेही संवर्धन
जुन्या सोन्याची पुनर्प्रक्रिया झाल्यास पर्यावरणाचेही संवर्धन होणार आहे. खाणींमधून नवे सोने बाहेर काढण्याची प्रक्रिया अत्यंत ऊर्जाखर्चिक असते. त्यामुळे ती पर्यावरणाच्या दृष्टीने लाभदायक ठरत नाही. या उलट आहे त्याच सोन्याची पुनर्प्रक्रिया केल्यास ते काम अतिशय कमी ऊर्जेत होते. त्यामुळे पर्यावरणाची हानी कमीत कमी होते. त्यामुळे भारतीयांनी पुनर्प्रक्रिकेसाठी सोने मुक्त करावे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरील आयातीचा ताण कमी होऊन अंतिमत: भारतीय नागरीकांचाच लाभ होईल, असे मत अर्थक्षेत्रातील अनेक जाणकारांचेही आहे.
सोन्यातील ‘मृत गुंतवणूक’ आकडेवारीत…
पडून असलेले सोने : किमान 3 कोटी ते 4 कोटी किलो
त्याची आजची किंमत : किमान 4.5 ते 6 कोटी कोटी रुपये
गेल्या आर्थिक वर्षातील सोने आयात : किमान 7 लाख कोटी रुपये
Comments are closed.