नियमांनुसार भारतीय अमेरिकेतून घरी परतत आहेत

परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांची संसदेत माहिती : ‘ही’ पहिलीच वेळ नसल्याचा मंत्र्यांचा दावा, 2009 पासूनच्या हद्दपारीची दिली माहिती,गेल्या 16 वर्षांत 15,652 भारतीय माघारी

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अमेरिकेने पाठवलेल्या भारतीय डायस्पोरांच्या संदर्भात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी राज्यसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान माहिती दिली. हद्दपारीची ही कारवाई नवीन नसून यापूर्वी इतर कोणत्याही देशात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या लोकांना त्यांच्या देशात परत पाठवले जात होते, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच सध्या अमेरिकेतून माघारी पाठविण्यात आलेल्या भारतीयांना योग्य नियमांच्या चौकटीत मायदेशी रवाना करण्यात आल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये गतिशीलता आणि स्थलांतर खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. एक देश म्हणून आम्ही कायदेशीर गतिशीलता पाळत एका देशातून दुसऱ्या देशात कायदेशीररित्या स्थलांतर करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देतो. मात्र, आम्ही कधीही बेकायदेशीर गतिशीलतेला प्रोत्साहन देत नाही. मात्र, आपले कोणतेही नागरिक बेकायदेशीरपणे दुसऱ्या कोणत्याही देशात गेले असतील तर तो देश त्यांच्या कायद्यानुसार त्यांना पकडतो आणि परत पाठवतो. ही प्रक्रिया नवीन नाही, असे परराष्ट्रमंत्र्यांनी गुरुवारी सभागृहात सांगितले.

अमेरिकेतून येणाऱ्या बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांच्या मुद्यावर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी संसदेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी 2009 पासूनच्या आकडेवारीचा अचूक संदर्भही दिला. गेल्या 16 वर्षांत 15,652 भारतीयांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे. 2019 मध्ये भारतात निर्वासित करण्यात आलेल्या लोकांची संख्या सर्वाधिक 2,042 होती. आम्ही कधीही बेकायदेशीर हालचालींच्या बाजूने नाही. यामुळे कोणत्याही देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले.

जयशंकर यांच्या वक्तव्यादरम्यान विरोधी सदस्यांकडून सभागृहात सतत गोंधळ सुरू होता. मात्र, जयशंकर यांनी त्यांचा योग्य सामना केला. प्रत्येक देशात राष्ट्रीयत्व तपासले जाते. लष्करी विमानाने पाठवण्याचा नियम 2012 पासून लागू आहे. याबाबत कोणताही भेदभाव झालेला नाही. बेकायदेशीर स्थलांतरित अडकले होते, त्यांना परत आणावे लागले. अमेरिकेने 5 जानेवारी रोजी 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना भारतात परत पाठवले आहे. अमेरिकन सैन्याच्या सी-17 विमानाने त्यांना पंजाबमधील अमृतसरला पाठवण्यात आले. अजूनही काही भारतीय टप्प्याटप्प्याने मायदेशी परततील असे ते म्हणाले.

काँग्रेसची निदर्शने

अमेरिकेतून भारतात पाठविण्यात आलेल्या भारतीयांच्या पायांना साखळ्या बांधण्यात आल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संसदेबाहेर आणि सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आंदोलन केले. यूएस बॉर्डर पेट्रोल चीफ मायकेल बँक यांनी त्यांच्या एक्स हँडलवर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यानंतर विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घातला आणि संसदेच्या आवारात निदर्शने केली. ‘आमच्या नागरिकांना दहशतवाद्यांसारखे वागवले गेले,’ असा आरोप काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी केला.

Comments are closed.