बहरीन विमानतळावर 28 फेब्रुवारीपासून व्यावसायिक उड्डाणे बंद, अडकलेल्या हिंदुस्थानींना सौदी अरेबियामार्गे परतण्याची व्यवस्था
बहरीन विमानतळावर 28 फेब्रुवारीपासून कोणतीही व्यावसायिक उड्डाणे सुरू नसल्याने तेथे अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना परत आणण्यासाठी हिंदुस्थानच्या दूतावासाने सौदी अरेबियामार्गे प्रवासाची व्यवस्था केली आहे.
बहरीनमधील हिंदुस्थानचे राजदूत विनोद के. जेकब यांनी सांगितले की, रियाधमधील हिंदुस्थानचा दूतावास सौदी अरेबिया सरकारकडून प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र ट्रान्झिट व्हिसा मंजुरी मिळवून देत आहे. बहरीनमधील दूतावासाकडून ट्रान्झिट व्हिसासाठी आलेल्या अर्जांची नोंद रियाध येथील दूतावासाकडे पाठवली जात आहे. त्यांनी सांगितले की, अडकलेल्या विशेषतः पर्यटन किंवा अल्पकालीन व्हिसावर आलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना प्राधान्य दिले जात आहे.
सध्या बहरीनमध्ये अडकलेल्या हिंदुस्थानींसाठी सौदी अरेबियामार्गे परतणे हा एकमेव व्यवहार्य पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ट्रान्झिट व्हिसा मिळवण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यात हिंदुस्थानला पुढील प्रवासासाठी निश्चित विमानतिकीट असणे आवश्यक आहे. सौदी अरेबियाचा ट्रान्झिट व्हिसा 72 ते 96 तासांसाठी वैध असेल आणि प्रवाशांना या कालावधीतच देश सोडावा लागेल.
दरम्यान, शेजारील राष्ट्र कतारमध्ये कतार एअरवेजकडून काही उड्डाणे पुन्हा सुरू झाली आहेत, ज्यामध्ये हिंदुस्थानकडे जाणाऱ्या उड्डाणांचाही समावेश आहे. मात्र ही उड्डाणे आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने अनेक प्रवाशांसाठी सौदी अरेबियामार्गे प्रवास हा पर्यायी मार्ग ठरत आहे.
दोहामधील हिंदुस्थानच्या दूतावासाने सांगितले की, सोमवारी दोहा–दिल्ली उड्डाणातून 300 हून अधिक भारतीय प्रवासी हिंदुस्थानात परतले. गेल्या तीन दिवसांत कतार एअरवेजच्या उड्डाणांद्वारे जवळपास 1,000 हिंदुस्थानी दोहामधून परतले आहेत.
दरम्यान, पश्चिम आशियातील देशांकडे अधिक उड्डाणे सुरू करण्यासाठी हिंदुस्थान सरकार प्रयत्न करत आहे. यासंदर्भात नागरी विमान वाहतूक मंत्रालय मंगळवारी विमान कंपन्या आणि इतर संबंधित घटकांसोबत बैठक घेणार आहे.
Comments are closed.