सूर्या, शुभमनला डच्चू द्या!

>> संजय कऱ्हाडे

अर्शदीप पंजाबचा, म्हणूनच बचावला! आफ्रिकेचा डाव संपल्यानंतर मागच्या मागेच तो त्याच्या घरी जाऊ शकला! अन्यथा, चार षटकांत नऊ आणि एका षटकात सात वाईड चेंडू टाकणाऱया अर्शदीपला गंपू गंभीरने गिळूनच टाकलं असतं! अर्थात, दवाने बुमरालाही तितकाच अप्रिय अनुभव दिला हे लक्षात आणून दिल्यावर अर्शदीपला बोलावणं धाडून परत बोलावून घेतलं म्हणे!

गमतीचा भाग सोडून द्या, डीकॉकने मैदानावर पाऊल ठेवताच गोलंदाजांचा समाचार घेताना अजिबात संकोच दाखवला नाही. त्याचे पाच चौकार अन् तब्बल सात षटकार अफलातून होते. जवळपास दोनशेच्या सरासरीने त्याने नव्वद धावा अक्षरशः फोडून काढल्या. त्याच्या बॅटची भाषा विलक्षण आक्रमक आणि शैलीदार होती. मार्क्रम, फरेरा आणि मिलर यांनीही त्यावर अलंकार चढवले आणि दोनशेपार धावसंख्या उभारली. यात आपण टाकलेल्या सोळा वाईडचाही सहभाग होता!

अभिषेक, शुभमन आणि सूर्याच्या काहीशा आततायी शैलीबद्दल बोलून फार काळ लोटलेला नव्हता. आणि गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या कमकुवत तंत्राचा कसा अभ्यास करतात याचा प्रत्यय काल आपल्याला आला. अभिषेक बेभरवशाचा, उपकप्तान शुभमनचं तंत्र धरू-मारू-की-सोडू अशा संभ्रमात सापडलेलं आणि सूर्याची आक्रमकता प्रतिस्पर्ध्यांनी समजून ओळखून दडपलेली. शुभमन आणि सूर्यकुमारची गेल्या बारा-पंधरा सामन्यांतली आकडेवारी बरंच काही सांगून जाईल! याच फलंदाजीला विश्वचषक जिंकून देणारी म्हणायचं का, असा माझा सवाल होता, आहे अन् सुधारेपर्यंत राहील! गंपू गंभीरने टी ट्वेंटी संघात ठेवलेले, कायम केलेले आणि नवनव्या क्रमांकावर सोडलेले फलंदाज त्याच्याच रणनीतीचा घात करणारे ठरू शकतात. वारंवार उभ्या केलेल्या माझ्या शंका संघाने चुकीच्या  ठरवल्या तर मला आनंदच होईल!

वनडे मालिकेच्या तिसऱया सामन्यापूर्वी आपल्या फलंदाजांकडे मोठय़ा धावसंख्येचा पाठलाग करण्याची हिंमत आहे की नाही याबद्दल मी किंतु बोलून दाखवला होता. त्या तिसऱया सामन्यात आपल्याला फक्त 270 धावांचा पाठलाग करायचा होता आणि यशस्वी, रोहित आणि विराट असे दमदार फलंदाज पहिल्या पाचात होते. तरीही 360 धावसंख्येचं दडपण त्यांना सोसलं असतं की नाही अशी मला शंका होती. येत्या काळात आपण पाहूच. काल तर दोनशेपार धावसंख्या समोर असताना आपल्या पहिल्या पाचात अभिषेक, शुभमन आणि सूर्यासारखे ‘ठकाही-खरं-नाही’ असे फलंदाज होते, पुढेही राहतील! अखेर, एक्कावन्न धावांचा अहेर मिळाला!

विश्वचषक जिंकण्यासाठी अंतिमतः निवडण्यात येणाऱया आपल्या संघात शुभमन, सूर्या, जितेश आणि इतर काही खेळाडूंसाठी जागा तरी असावी का, असा प्रश्न मला आज प्रामाणिकपणे पडलाय!

Comments are closed.