IND vs AUS – ऑस्ट्रेलियाचा तडाखा!
>> संजय कऱ्हाडे
काल हेझलवूडने रोहित शर्माला ऑफ स्टंपबाहेरील चेंडूंनी हैराण करून बाद केलं अन् स्टार्कने कोहलीला भोपळा फाडू न देता तंबूत पाठवलं. मग, दोघांच्या संघातल्या निवडीनंतर निर्माण झालेल्या विवादांच्या दलदलीत हिंदुस्थानी फलंदाजी गुडूप झाली, असं माझं पक्कं मत आहे.
रोहित आणि कोहलीची मनःस्थिती मला किंचित द्विधा वाटली. कुठेतरी एखादा किंतु-परंतु डोक्यात घर करून गेलाय असंही वाटलं. पुढे पडणारं पाऊल चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहचत नव्हतं, बॅट शरीरापासून दूर राहत होती आणि एकाग्रता नावाची ढाल किट बॅगमध्ये विसरून आलेत की काय अशी शंका मनाला चाटून जात होती!
इंग्लंड अन् घरच्या संथ, चेंडूला फारशी उसळी न देणाऱया खेळपट्टय़ांवर दादागिरी करून झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच वन डे सामन्यात आपल्या अवांतर फलंदाजीचं दारिद्रय़ पर्थला उघडं पडलं. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना पावसाचीही साथ मिळाली. ढगाळ वातावरणात वारंवार व्यत्यय आला, फलंदाजांची एकाग्रता मोडून गेली. त्यात भर, चेंडू स्विंग झाला, सीम झाला, क्रिकेटप्रेमींच्या आशा मालवून गेला.
‘रो-को’नंतर कप्तान गिल, श्रेयस वगैरे मंडळी उसळत्या चेंडूंचा सामना करताना पाहून वाटलं, जणू ते सारे पोळय़ातून अचानकपणे बेछूट झालेल्या मधमाशांचा सामना करत असावेत! किंवा डुगडुगत्या स्टुलावर टाचा उंचावून भिंतीवरचा बल्ब काढण्याचा प्रयत्न करत असावेत! राहुल, अक्षयने थोडा तोल सावरण्याचा यत्न केला, पण ते तेवढंच.
पार आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाज तैनात करण्याचा गंभीरचा मनसुबा तर तकलादू ठरला. अर्थात, संघातले आघाडीचे सहा फलंदाज जी कामगिरी करू शकणार नाहीत ती किंवा तशी कामगिरी सात अन् आठव्या क्रमांकाचे फलंदाज करतील अशी अपेक्षा ठेवणंसुद्धा हास्यास्पद म्हणावं लागेल.
ऑस्ट्रेलियाचा कप्तान मार्शने मात्र इतरांना साथीला घेऊन उण्यापुऱया एकशे एकतीस धावांच्या आव्हानाच्या काथ्या कुटून काढल्या. नव्या ऑप्टस स्टेडियमवर पर्थमधला पहिलाच विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने त्यांची मालिकेपुरतीची धोरणं स्पष्ट केली आणि तीन सामन्यांच्या मालिकेत आपल्या गळय़ात 0-1 ची पिछाडी लटकवली!
अर्शदीपने ट्रव्हिस हेडला झटपट बाद करून आपल्या आशा पल्लवीत केल्या, पण त्या तितक्याच चटपट धुळीतही मिळाल्या. सिराज, हर्षित इत्यादींसाठी खिशात धावांचा कोष नव्हता त्यामुळे त्यांचे आणि फिरकीबद्दारांचेही प्रयत्न थिटेच ठरणार होते, ठरले!
आता, पहिल्याच सामन्यानंतर तेल गेलं, तूप गेलं, जेवण गेलं, झोप गेली, इज्जत गेली, अब्रू गेली, रविवारची सुट्टी गेल्यानंतर अॅडलेडला हाती काही गवसतंय की धुपाटणं येतंय हेच पाहायचं!
Comments are closed.