न्यूझीलंडसोबत भारताचा मुक्त व्यापार करार
95 टक्के वस्तूंवर शुल्क कपात जाहीर, 5 वर्षांत दुप्पट व्यापार करण्याचे ध्येय
► वृत्तसंस्थानवी दिल्ली
दीर्घ प्रतीक्षेनंतर भारत आणि न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार करार झाला आहे. या ‘एफटीए’मुळे न्यूझीलंडच्या 95 टक्के वस्तूंवरील शुल्क कमी करण्यात आले आहेत. हा करार न्यूझीलंडसाठी 140 कोटी भारतीय ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची एक मोठी संधी मिळणार आहे. या ऐतिहासिक कराराअंतर्गत, न्यूझीलंडच्या 95 टक्के वस्तूंवरील निर्यात कर काढून टाकण्यात आले आहेत किंवा कमी करण्यात आले आहेत. पहिल्या दिवसापासून 57 टक्के वस्तू करमुक्त असतील. तसेच करार लागू होताच 82 टक्क्यांपर्यंत वाढतील, तर उर्वरित 13 टक्के वस्तूंवर लक्षणीय करकपात करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
व्यापार करारात वित्तीय सेवा, ई-पेमेंट आणि फिनटेक सारख्या क्षेत्रांवर देखील भर देण्यात आल्यामुळे भारत आणि न्यूझीलंडमध्ये नवीन संधी निर्माण होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी सोमवारी फोनवरून संवाद साधत या एफटीए कराराच्या यशाची घोषणा केली. दोन्ही नेत्यांनी पुढील पाच वर्षांत व्यापार दुप्पट करण्याचे आणि पुढील 15 वर्षांत न्यूझीलंडमधून भारतात 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
अधिकृत निवेदनानुसार, या करारामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांना भारतात त्यांची उत्पादने विकण्यास लक्षणीयरीत्या मदत होईल. मटण, लोकर, कोळसा आणि भाजीपाला उत्पादनांसारख्या वस्तूंवरील कर त्वरित काढून टाकण्यात येतील. याव्यतिरिक्त किवीफ्रूट आणि सफरचंद सारख्या उत्पादनांसाठी विशेष प्रोत्साहने देण्यात आली आहेत. त्याव्यतिरिक्त माशांसारख्या सागरी उत्पादनांवरील कर सात वर्षांमध्ये रद्द केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा?
या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढेल. दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी कृषी, एमएसएमई, शिक्षण आणि क्रीडा यासारख्या क्षेत्रात नवीन संधी निर्माण होतील. या कराराद्वारे दोन्ही देशांनी मजबूत आर्थिक संबंध निर्माण करण्याचे वचन दिले आहे. या करारामुळे क्रीडा, शिक्षण आणि लोकांमधील संबंध देखील मजबूत झाल्यामुळे नवीन संधी निर्माण होतील. याव्यतिरिक्त या करारामुळे न्यूझीलंडची निर्यात दुप्पट होण्यास मदत होईल.
न्यूझीलंड पंतप्रधानांचे ट्विट
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वर ‘आम्ही भारतासोबत मुक्त व्यापार करार केला आहे. यामुळे न्यूझीलंडमधील शेतकरी, उत्पादक आणि व्यवसायांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील, निर्यात वाढेल, नोकऱ्या निर्माण होतील आणि उत्पन्न वाढेल, ज्यामुळे सर्व न्यूझीलंडवासीयांना भरभराट होण्यास मदत होईल’ असे म्हटले आहे.
Comments are closed.