IND vs AFG: क्लिन स्वीपसह टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! 200 पेक्षा जास्त लक्ष्याचा पाठलाग करताना नोंदवला सर्वात मोठा विजय

शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीची सुरुवात अत्यंत दिमाखात केली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध घरच्या मैदानावर झालेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने तिन्ही सामने जिंकून 3-0 ने ‘क्लिन स्वीप’ केला आहे. या मालिकेतील तिसरा सामना चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर झाला. यात अफगाणिस्तानने दिलेल्या 219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अवघ्या 28.4 षटकांत (म्हणजेच 128 चेंडू शिल्लक असताना) विजय मिळवला. वनडे क्रिकेटच्या इतिहासात 200 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना चेंडू शिल्लक ठेवण्याच्या बाबतीत भारताचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma & Yashavi jaiswal) आणि यशस्वी जयस्वाल या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 170 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा 79 धावा करून बाद झाला, तर यशस्वी जयस्वाल 110 धावांवर नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. 200 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना चेंडू शिल्लक ठेवण्याच्या बाबतीत हा जगातील चौथा सर्वात मोठा विजय आहे. या यादीत 2003 मध्ये कॅनडाविरुद्ध 177 चेंडू राखून जिंकलेला वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे.

वनडेत 200 हून अधिक लक्ष्याचा पाठलाग करताना चेंडूंच्या आधारावर सर्वात मोठे विजय!

वेस्ट इंडिज: 177 चेंडू राखून विरुद्ध कॅनडा (203 धावांचे लक्ष्य, 2003)

ऑस्ट्रेलिया: 144 चेंडू राखून विरुद्ध बांगलादेश (230 धावांचे लक्ष्य, 2011)

पाकिस्तान: 142 चेंडू राखून विरुद्ध भारत (217 धावांचे लक्ष्य, 1997)

भारत: 128 चेंडू राखून विरुद्ध अफगाणिस्तान (219 धावांचे लक्ष्य, 2026)

भारत: 127 चेंडू राखून विरुद्ध श्रीलंका (217 धावांचे लक्ष्य, 2017)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा रेकॉर्ड अत्यंत जबरदस्त आहे. अफगाणिस्तानला आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून एकदाही भारताला हरवता आलेले नाही. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण 18 सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी 16 सामने भारताने जिंकले आहेत, एक सामना टाय झाला आहे, तर एक सामना अनिर्णित (रद्द) राहिला आहे.

Comments are closed.