'सिंदूर' मध्ये भारताची 'साधने' सुरक्षित आहेत
लोकसभेत राजनाथ सिंह यांची गर्जना, महाचर्चेला प्रारंभ, विरोधकांच्या आरोपांना सरकारचे प्रत्युत्तर
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भ्याड आणि धर्मांध दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रचंड दणका दिला आहे. भारताने ‘सिंदूर अभियाना’च्या अंतर्गत जो यशस्वी प्रतिशोध घेतला, त्यामुळे पाकिस्तानला मोठा धडा मिळाला आहे. भारताने आपले अभियान आपली उद्दिष्ट्यो साध्य झाल्यानंतर स्थगित केली. पाकिस्ताननेच भारताला शस्त्रसंधी करण्याची विनंती केली होती. या सर्व प्रक्रियेत कोणाचीही मध्यस्थी नव्हती, अशी स्पष्टोक्ती भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केली आहे. या अभियानात भारताच्या कोणत्याही ‘महत्वपूर्ण साधना’ची हानी झालेली नाही, असेही सूचक विधान त्यांनी केले आहे. या अभियानात भारताची किती विमाने पडली, असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार विचारला जात आहे. या प्रश्नाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हे सांकेतिक प्रत्युत्तरच दिले आहे, असे आता मानले जात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानचा कणा मोडणारे भारताचे ‘सिंदूर अभियान’ या विषयावर सोमवारी लोकसभेत महाचर्चेला प्रारंभ करण्यात आला आहे. याच चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांनी संसदेच्या वर्षाकालीन अधिवेशनाचे सोमवारपर्यंतचे सर्व दिवस कामकाज होऊ दिले नव्हते. ही चर्चा सोमवारी रात्री उशीरापर्यंत अपुरी राहिली. ती आज मंगळवारही पुढे चालविली जाणार आहे.
राजनाथ सिंह यांच्याकडून प्रारंभ
लोकसभेतील चर्चेचा प्रारंभ भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केला. त्यांनी भारताच्या ‘सिदूर’ अभियानाच्या यशासंबंधी भारतीय सेनादलांचे अभिनंदन केले. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही पाकिस्तानला जन्मभर लक्षात राहील असा धडा शिकविला आहे. पाकिस्तानची आतोनात हानी झाली आहे. त्या देशातील 9 दहशतवादी तळ आणि पाकिस्तानचे 11 वायुतळ आमच्या अभियानामुळे नष्ट झाले. भारताची संरक्षणसामग्री किती प्रभावी आहे, याचे साऱ्या जगाला दर्शन घडले. या अभियानात भारतीय सेनादलांनी अतुलनीय आणि देदिप्यमान पराक्रम गाजवला असून साऱ्या देशाला त्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे. ‘धर्म’ विचारुन हत्या करणाऱ्यांना आम्ही उखडून टाकले, असे गर्वोन्नत विधान त्यांनी केले.
विरोधकांवरही घणाघात
आपली सेना शत्रूविरोधात प्रराक्रम गाजवत असताना, विरोधक त्यांच्याच संबंधी संशय व्यक्त करीत होते. आपले अभियान यशस्वी झाले याचा अभिमान आणि आनंद मानण्याऐवजीत आपली हानी किती झाली, असा प्रश्न विचारुन आपल्या देशाचेच मनोबल खच्ची करण्यात समाधान मानत होते. हा संपूर्ण अभियानात आमच्या कोणत्याही महत्वाच्या साधनाची हानी झालेली नाही. अल्प स्वरुपाची हानी होणे नैसर्गिक आहे. जेव्हा एखादा विद्यार्थी परीक्षा देतो आणि यशस्वी होतो, तेव्हा त्याचे अभिनंदन केले जाते. त्याच्या पेनाचे निब का मोडले, असा प्रश्न विचारणे हास्यास्पद आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी विरोधकांची खिल्ली उडविली.
गौरव गोगोई यांचे आरोप
काँग्रेसच्या वतीने खासदार गौरव गोगोई यांनी सरकारवर अनेक आरोप केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा संघर्ष माझ्यामुळे थांबला, असे विधान किमान 28 वेळा केले आहे. मग भारत त्याला प्रत्युत्तर का देत नाही? भारताने हे अभियान अकस्मात का थांबविले? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच भारताने किती विमाने या संघर्षात गमावली, अशीही पृच्छा त्यांनी केली. भारताची विमाने पडली असतील, तर हे अभियान यशस्वी झाले, असे कसे म्हणता येईल, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. सरकारने भारताची किती हानी झाली, हे जनतेकडे आणि सैनिकांकडे स्पष्ट केले पाहिजे, असे प्रतिपादन करतानाच त्यांनी सरकार बऱ्याच बाबी लपवत आहे, असा आरोपही केला.
मग मुंबई हल्ल्याचे काय ?
विरोधकांच्या आरोपांना चपखल उत्तरे देण्याचे काम संयुक्त जनता दलाचे नेते आणि केंद्रीय मंत्री लालन ंिसंग यांनी केले. सरकारच्या वतीने आघाडी सांभाळताना त्यांनी 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्याचा उल्लेख केला. शेकडो निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या या भीषण दहशतवादी हल्ल्याला तत्कालीन काँग्रेसप्रणित सरकारने कोणतेही प्रत्युत्तर का दिले नाही, असा खोचक प्रश्न त्यांनी विचारला. आज जे सरकारला उत्तर विचारत आहेत, त्यांची त्यावेळी बोलती का बंद झाली होती, अशा अर्थाचा प्रतिहल्ला त्यांनी चढविला. ‘सिंदूर अभियानाच्या माध्यमातून भारतीय सेनादलांनी आपले सामर्थ्य आणि श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. त्यांच्यावर संयश घेण्याचे कृती कोणी करु नये, असा प्रतिहल्ला त्यांनी चढविला.
जयशंकर यांच्याकडून खंडन
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनीही त्यांच्या भाषणात विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारताने हे अभियान हाती घेतले. पाकिस्तानला मार असह्या झाला, तेव्हा त्या देशाने भारताला हल्ले थांबविण्याची विनंती केली. भारताने आपली उद्दिष्ट्यो साध्य झालेली असल्याने पाकिस्तानची ही विनंती स्वीकारून अस्थायी शस्त्रसंधी केली आहे. मात्र, कोणीही या कामी मध्यस्थी केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 22 एप्रिलपासून 17 जूनपर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपर्क केलेला नाही. हा केवळ द्विपक्षीय निर्णयच आहे. याचा संबंध कोणत्याही व्यापार कराराशीही जोडला जाऊ शकत नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी विरोधकांकडून होणाऱ्या मध्यस्थीच्या आरोपांच्या संदर्भात आपल्या भाषणात केली आहे.
पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने केवढी मोठी झेप घेतली आहे, हे ‘सिंदूर अभियाना’च्या यशामुळे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत अशाच प्रकारे दहशतवादाला ठेचून काढणार आहे, हे दहशतवादी, त्यांच्या संघटना आणि त्यांना पाठबळ देणारे देश यांनी पुरतेपणी ध्यानात घ्यावे, असे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी प्रास्ताविक भाषणात केले.
सप खासदाराचे वादग्रस्त विधान राजभर
लोकसभेत महाचर्चेला प्रारंभ होण्याआधीच जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्यात भाग घेतलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे वृत्त थडकल्याने सत्ताधारी लोकप्रतिनिधींमध्ये वेगळाच उत्साह संचारल्याचे दिसून आले. मात्र, समाजवादी पक्षाचे खासदार रमाशंकर राजभर यांनी वादग्रस्त विधान केले. संसदेतील ही चर्चा आधी आयोजित केली असती, तर दहशतवाद्यांना त्या दिवशी ठार करण्यात आले असते, असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांच्या या सूचक विधानावर सोशल मीडियात टीकेचे मोहोळ निर्माण झाले आहे.
चर्चेच्या कालावधीत वाढ
लोकसभेतील या चर्चेचा प्रारंभ दुपारी 2 वाजता करण्यात आला. त्याआधी 1 वाजेपर्यंत विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज स्थगित करावे लागले होते. त्यामुळे चर्चा होऊ शकणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. तथापि, दोन वाजता शांततेत चर्चेला प्रारंभ झाला. प्रारंभी रात्री दहा वाजेपर्यंतचा समय देण्यात आला होता. नंतर तो रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. ही चर्चा मंगळवारीही पुढे चालविली जाणार असून मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभेत प्रथम भाषण करतील. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लोकसभेत चर्चा चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे. मंगळवारीही ही चर्चा साधारणत: आठ तास चालण्याची शक्यता आहे. लोकसभेतील चर्चा पूर्ण झाल्यानंतर राज्यसभेत चर्चेला प्रारंभ होणार, की लोकसभेत चर्चा होत असतानाच राज्यसभेतही तिचा प्रारंभ होणार हे अद्याप समजलेले नाही. मात्र, दोन्ही सभागृहांमध्ये सरकारचे समर्थक आणि विरोधक सोमवारप्रमाणेच एकमेकावर तुटून पडणार आहेत, हे निश्चित मानण्यात येत आहे.
चिदंबरम पाकिस्तानच्या बाजूने?
लोकसभेत चर्चा होत असताना काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या विधानाने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी हे पाकिस्तानचेच आहेत, हे भारत सरकारने ओळखले कसे, असा आजवर पाकिस्ताननेही न विचारलेला प्रश्न चिदंबरम यांनी विचारला आहे. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकेचा वर्षाव होत असून त्यांनी त्यांच्या निष्ठा कोठे आहेत, ते एकदा स्पष्ट करावे, अशी मागणी सोशल मीडियावरून केली जात आहे.
ड भारत आता पाकिस्तानला डोसियर नाही, तर सज्जड डोस देईल. काँग्रेस सरकारच्या काळात भारतात दहशतवादी हल्ला झाल्यावर पाकिस्तानला कागदपत्रे पाठविली जात. आजचा भारत पाकिस्तानला जबर धडा शिकवीत आहे. यापुढेही पाकिस्तानने दु:साहस केल्यास त्याला प्रचंड तडाखा दिला जाणार आहे.
– केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (भाजप)
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचे सामर्थ्य प्रचंड वाढले आहे. ते भारताचे डिफेंडर (संरक्षक) आहेत, तर काँग्रेस पाकिस्तानसमोर ‘सरेंडर’ करत होती. भारताच्या सामर्थ्याचा आता जगाला परिचय झाला असून कोणीही भारताकडे वाकड्या दृष्टीने पाहू शकणार नाही, हे निश्चित आहे.
– तेजासवी सूर्य (भारतीय जनता पार्टी)
ड भारताने प्रत्येक वेळी शांततेसाठी हात पुढे केला. पण पाकिस्ताने नेहमी त्याचे रक्तच सांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळातच पाकिस्तानला धडा मिळाला. काँग्रेसने नेहमी राष्ट्रहिताशी तडजोड करुन पाकिस्तानसमोर शरणागतीच पत्करल्याचे दिसून येते. काँग्रेसने प्रवृत्तीत परिवर्तन केले पहिजे.
– वैजयंत पांडा (भारतीय जनता पाक्ष)
सरकारच्या विरोधात
ड केंद्र सरकार ‘सिंदूर अभियान’ यशस्वी झाल्याचे प्रतिपादन करीत आहे. तथापि, पहलगाम येथे हल्ला करणारे दहशतवादी जो पर्यंत मोकाट फिरत आहेत, ते जोपर्यंत पकडले जात नाहीत, तो पर्यंत हे अभियान यशस्वी झाले, असे म्हणता येणार नाही, व्यर्थ वल्गना करण्यात काहीही अर्थ नाही.
– सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
ड पाकिस्तान भारतात दहशतवादी हिंसाचार घडवतो असे भारत सरकारचे म्हणणे असेल, तर पाकिस्तानशी क्रिकेटचे सामने का खेळले जातात? पाकिस्तान शरण आला असे म्हटले जाते. मग भारत सरकारने बिनाशर्त शस्त्रसंधी का स्वीकारली? पाकिस्तावर अटी का घातल्या नाहीत?
– अरविंद सावंत (शिवसेना उबाठा गट)
ड पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी कोठून आले आणि कोठे गेले, याचा काहीही पत्ता भारताच्या सरकारला लागलेला नाही. हे सरकार उत्तरे देण्यापासून स्वत:ला वाचवत आहे. विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे धाडस या सरकारमध्ये नाही. केवळ वेळ मारुन नेण्याचे काम हे सरकार करीत आहे.
– प्रणिती शिंदे (काँग्रेस)
Comments are closed.