खमेनी यांना भारताची श्रद्धांजली

होर्मुसची सामुद्रधुनी भारतासाठीही मोकळी, तेल समस्या संपण्याची शक्यता, वाढली युद्धाची व्याप्ती

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्या युद्धात मारले गेलेले इराणचे धार्मिक नेते आयातोल्ला अली खामेनेई यांना भारताने श्रद्धांजली अर्पण केली आहे. 2 मार्च या दिवशी इस्रायलच्या वायुहल्ल्यात त्यांच्यासह इराणच्या अनेक प्रशासकीय आणि धार्मिक नेत्यांचा अंत झाला आहे. भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री यांनी इराणच्या भारतातील दूतावासात जाऊन त्यांच्या मृत्यूसंबंधात दु:ख व्यक्त केले. त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना दूरध्वनी केला आणि भारताच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली. इराणच्या धार्मिक नेत्याच्या मृत्यूवर भारताने आपली प्रतिक्रिया दिली नाही, असा आक्षेप विरोधी पक्षांनी व्यक्त केला होता. भारत या युद्धात अमेरिका आणि इस्रायलच्या बाजूचा असल्याप्रमाणे वागत आहे, अशीही टीका होत होती. तथापि, हे युद्ध लवकरात लवकर थांबावे आणि शांतता प्रस्थापित व्हावी, हीच भारताची मागणी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्यक्तव्यात स्पष्ट केले आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी भारतासाठी मोकळी

होर्मुझची सामुद्रधुनी केवळ युरोप, अमेरिका आणि इस्रायल यांच्यासाठी बंद करण्यात आली आहे. इतर देशांसाठी ती मोकळी आहे, असे इराणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही गुरुवारची सर्वात मोठी घटना आहे. यामुळे आखाती देशांकडून भारताला होणारा तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी भारतासाठी कच्चे इंधन तेल आणि इंधन वायूची समस्या निर्माण होणार नाही, असा उत्साहवर्धक निष्कर्ष आता काढला जात आहे.

इराणकडून स्पष्ट घोषणा

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याची घोषणा युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर दोन दिवसांमध्ये केली होती. तथापि, गुरुवारी इराणची प्रशासकीय यंत्रणा आयआरबीईने ही सामुद्रधुनी केवळ युरोपियन देश आणि त्यांचे पाश्चिमात्त्य मित्र देश तसेच इस्रायलसाठी बंद राहील, अशी नवी घोषणा केली. त्यामुळे भारतासाठीही हे क्षेत्र मोकळे राहणार आहे. परिणामी, तेलवाहतूक करणाऱ्या व्यापारी नौका आता भारतापर्यंत पोहचण्याची शक्यता वाढली असल्याचे या घोषणेवरुन दिसत आहे.

भारताचे आवाहन

हे युद्ध लवकरात लवकर थांबावे, असे आवाहन भारताने केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात संदेश दिला असून युद्धामुळे समस्या सुटत नाहीत, ही भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. युद्धापेक्षा चर्चा आणि सामोपचाराच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न सर्व संबंधितांनी करावा. या युद्धामुळे जगाची घडी विस्कटण्याची परिस्थिती निर्माण होताना दिसून येत आहे.

पर्यायी योजनाही सज्ज

कच्चे इंधन तेल आणि इंधन वायू मिळविण्यासाठी भारताने पर्यायही सज्ज ठेवले आहेत. या संदर्भात व्हेनेझुएला या देशाशी चर्चा केली जात आहे. तो देश भारताला प्रतिदिन मोठ्या प्रमाणात तेल पुरवठा करण्यास राजी आहे. रशियानेही भारताला साहाय्याचा हात दिला असून 95 लाख बॅरल तेल भारतासाठी सज्ज ठेवल्याची माहिती दिली आहे. होमुझची सामुद्रधुनी मोकळी झाल्याने भारताला आखाती देशांकडूनही तेल आणि वायू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

होर्मुझ प्रथमच बंद

होर्मुझची सामुद्रधुनी इतिहासात यावेळी प्रथमच बंद करण्यात आली होती. आतापर्यंतच्या मध्यपूर्वेतील कोणत्याही संघर्षांमध्ये ती व्यापारी नौकांसाठी बंद करण्यात आली नव्हती. यावेळी इराणने तो निर्णय घेतल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. पण आता त्यासंबंधात स्थिती अधिक स्पष्ट केली गेली आहे.

तुलनात्मक सहिष्णुता

  • होमुझची सामुद्रधुनी अंशत: मोकळी झाल्याने भारतासाठी सुसह्या स्थिती
  • परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची इराणी मंत्र्यांशी दूरध्वनी चर्चा
  • युद्ध शक्य तितक्या लवकर थांबविण्याचे भारताचे सर्व संबंधितांना आवाहन

Comments are closed.