पाकिस्तानी निवडकर्त्याला बुमराहचं यश पचेना; जगातील सर्वोत्तम गोलंदाजाची केली तुलना चक्क संशयास्पद ॲक्शन असलेल्या खेळाडूशी

टी 20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) मध्ये भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचे जगभरात कौतुक होत आहे. मात्र, पाकिस्तानला भारताचे हे यश पचवणे कठीण जात असल्याचे दिसत आहे. पाकिस्तानी निवड समितीचे सदस्य आकिब जावेद यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल एक अजब विधान केले आहे.
पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीवर बोलताना आकिब जावेद यांनी बुमराहची तुलना वादग्रस्त गोलंदाज उस्मान तारिकशी केली. ते म्हणाले, आजच्या काळात जसप्रीत बुमराह हा एकमेव असा गोलंदाज होता ज्याला कुणी हरवू शकले नाही, पण आता त्यालाही मार पडायला लागला आहे. बुमराहची ॲक्शन सामान्य गोलंदाजांसारखी नाही. तो वेगवान गोलंदाजांमधला ‘उस्मान तारिक’ (Usmaan Tariq) आहे. तो इतक्या वेगाने चेंडू टाकतो की फलंदाजाला विचार करायला वेळच मिळत नाही.
आकिब जावेद यांनी केलेली ही तुलना अत्यंत हास्यास्पद मानली जात आहे, कारण जसप्रीत बुमराह हा जगातील तिन्ही फॉरमॅटमधील (Test, ODI, T20) सर्वात घातक गोलंदाज मानला जातो. त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. पाकिस्तानने उस्मान तारिकचा खूप गाजावाजा केला होता, पण वर्ल्ड कपमध्ये मोठ्या संघांसमोर त्याची चांगलीच धुलाई झाली. विशेष म्हणजे, उस्मानच्या गोलंदाजीच्या ॲक्शनवर (Action) सतत संशय घेतला जातो. आतापर्यंत तीनवेळा त्याच्या ॲक्शनची तपासणी झाली आहे. एकीकडे बुमराहने भारताला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तर दुसरीकडे उस्मान तारिकचे करिअर संशयाच्या भोवऱ्यात आहे. अशा परिस्थितीत, जगातील नंबर 1 गोलंदाजाची तुलना एका संशयास्पद ॲक्शन असलेल्या गोलंदाजाशी करणे, हे आकिब जावेद यांचे वैफल्य दर्शवते, अशी टीका आता क्रिकेट चाहत्यांकडून केली जात आहे.
Comments are closed.